ठाणे महापालिकेच्या दोन लाचखोर लिपिकांना लाच घेताना रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 07:19 PM2018-05-16T19:19:14+5:302018-05-16T19:19:14+5:30
घराचे बांधकाम पाडण्याची धमकी देऊन लाच घेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी अटक केली.
ठाणे : महापालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली. घराचे बांधकाम न पाडण्यासाठी त्यांनी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारली.
वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक किशोर हिरामण झेंडे आणि अरविंद चंद्रकांत जैस्वार ही आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराचा बांधकामाचा व्यवसाय आहे. त्यांचे वागळे इस्टेट भागामध्ये घरांचे बांधकाम होते. हे बांधकाम न पाडण्यासाठी किशोर झेंडे याने तक्रारदारास पाच हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराच्या बांधकामाबाबत त्याला महापालिकेने कोणतीही रितसर नोटीस बजावली नव्हती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार किशोर झेंडेला भेटला असता त्याने पुन्हा लाचेची मागणी केली. तीन हजार रुपयांमध्ये या प्रकरणाची तडजोड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे बुधवारी दुपारी ३ वाजता तक्रारदार आरोपीला ३ हजार रुपयांची लाच देण्यासाठी रायलादेवी प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर गेले. यावेळी किशोर झेंडने लाच घेण्यासाठी स्वत: न जाता, वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयातील लिपिक अरविंद चंद्रकांत जैस्वार याला पाठवले. या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस निरीक्षक संजय सादिगले यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना अरविंद जैस्वारला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचेची मागणी किशोर झेंडेने केल्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली.