वाझे संचालक असलेल्या दोन कंपन्या झाल्या बंद; एक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:31 AM2021-03-16T03:31:35+5:302021-03-16T06:55:06+5:30
मल्टिबिल्ड इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड आणि टेकलिगल सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या दोन कंपन्या बंद असून, केवळ डिजिनेक्स्ट मल्टिमीडिया लिमिटेड ही एकच कंपनी सुरू असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीवरून दिसत आहे.
नारायण जाधव -
ठाणे : राष्ट्रीय तपास एजन्सीने अटक केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आले आहेत. त्यांची तीन कंपन्यांत मोठी गुंतवणूक असल्याचे आरोप झाल्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या तपासणीत आरोप ठेवलेल्या तीनपैकी दोन कंपन्या बंद असून, एकच कंपनी सध्या सुरू असल्याचे समाेर आले.
मल्टिबिल्ड इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड आणि टेकलिगल सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या दोन कंपन्या बंद असून, केवळ डिजिनेक्स्ट मल्टिमीडिया लिमिटेड ही एकच कंपनी सुरू असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीवरून दिसत आहे. या तिन्ही कंपन्या ठाण्यातील कोर्टनाका येथील केळकर कम्पाउंडमधील कार्यालय क्रमांक १ येथे नोंदणीकृत असल्याचे दाखवीत आहेत.
सुरू असलेली डिजिनेक्स्ट मल्टिमीडिया लिमिटेड ही कंपनी ३० सप्टेंबर २०१७ रोजी अस्तित्वात आल्याचे दिसत असून, तिचे भागभांडवल पाच लाख आणि पेड अप कॅपिटल पाच लाख रुपये आहे. कंपनी दूरसंच निर्मितीसह रेडिओ ट्रान्समीटर्स आणि टेलिफोन, टेलिग्राफी साहित्य उत्पादनात सक्रिय असल्याचे दाखवत आहे. कंपनीची शेवटची सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०१७ रोजी झाली असून, शेवटची बॅलन्सशीट ३१ मार्च २०१७ रोजी सादर केलेली आहे. या कंपनीत व्यंकटेश अप्पासाहेब वाझे, शिरीष थोरात, सचिन हिंदुराव वाझे हे तिघे २९ सप्टेंबर २०११, तर संज्योग शिवाजी शेलार आणि सुमित महेंद्र राठोड, अलोक जयंत ठक्कर हे २७ डिसेंबर २०१२ पासून संचालक असल्याची नोंद आहे.
याशिवाय मल्टिबिल्ड इन्फ्रा प्रोजेक्टस्, लिमिटेड ही कंपनी सध्या बंद असल्याचे दाखवीत असून, तिची २९ जानेवारी २०१३ रोजी स्थापना झाल्याची नोंद आहे. कंपनीचे भाग भांडवल आणि पेड अप कॅपिटल प्रत्येकी पाच लाख आहे. कंपनी बांधकाम व्यवसाय आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. संजय चंद्रकांत मशीलकर, उदय पुंडलिक वागळे, यश उदय वागळे, विजय पंढरी गवई आणि सचिन हिंदुराव वाझे हे १९ जानेवारी २०१३ पासून येथे संचालक असल्याची नोंद आहे. मात्र, कंपनीच बंद असल्याने सर्वसाधारण सभा अथवा बॅनल्सशीट सादर केल्याची नोंद नाही.
तिसरी कंपनी टेकलिगल सोल्युशन्स प्रा. लिमिटेड हिची ५ फेब्रुवारी २०१० रोजी स्थापना झाली असून, कंपनीचे भाग भांडवल दोन लाख आणि पेड अप कॅपिटल एक लाख ३० रुपये आहे. ही कंपनी सध्या बंद असून, सचिन वाझेंसह शिरीष थोरात हे १ मार्च २०११ आणि मंदार विश्वास जोशी यांची २९ सप्टेंबर २०१२ पासून संचालक म्हणून नोंद करण्यात आली आहे. कंपनीची शेवटची सर्वसाधारण सभा ३० ऑगस्ट २०११ रोजी झाली असून, शेवटची बॅलन्सशीट ३१ मार्च २०११ रोजी सादर केलेली आहे.