फायनान्स कंपनीची वाहने परस्पर विकणाऱ्या दोघा भामट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:04 AM2019-07-11T00:04:54+5:302019-07-11T00:04:57+5:30
कंपनीच्या वसुली अधिकाºयाचा प्रताप : १७ दुचाकी केल्या हस्तगत
ठाणे : वाहनखरेदीसाठी कर्जपुरवठा करणाºया ठाण्यातील एका वित्तीय संस्थेच्या थकबाकीदारांच्या वाहनांची परस्पर विक्री करणाºया दीपक रावत (३७, रा. मालाड, मुंबई) आणि अजगर खान (२८, रा. शांतीनगर, भिवंडी) या दोघांना नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी दिली.
पाचपाखाडीतील ‘साई पॉइंट’ या वाहनांना कर्जपुरवठा करणाºया कंपनीतून बरीच वाहने बेपत्ता असल्याची तक्रार या कंपनीने नौपाडा पोलिसांकडे केली होती. याच कंपनीचा मुख्य वसुली अधिकारी दीपक रावत यानेच अजगर खान या दलालाच्या मदतीने थकबाकीदारांची वाहने परस्पर आणून ती कंपनीत न ठेवता आपल्याच गोदामात ठेवली. नंतर, त्यांची त्याने विक्रीही केली. अशाच विक्री केलेल्या वाहनांपैकी एकाच्या मालकाने आरटीओ कार्यालयात मोटारसायकलच्या नोंदणीसाठी लागणारा नाहरकत दाखला (एनओसी) साई पॉइंट कंपनीकडे मागितला. परंतु, त्या दुचाकीच्या विक्रीची नोंदच कंपनीत नव्हती. शिवाय, ती वाहने या कंपनीत उपलब्धही नव्हती. त्यामुळे कंपनीचे मालक दिलीप पाटील यांनी इतरही वाहनांची चौकशी केली. तेव्हा अनेक वाहने बेपत्ता असल्याचे आढळले. त्यानंतर याप्रकरणी चौकशीचा अर्ज दोन महिन्यांपूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात या कंपनीने केला. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी या अर्जाची चौकशी केल्यानंतर हे रॅकेट उघड झाले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कवळे आणि पोलीस हवालदार अहिरे आदींच्या पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. तेव्हा साई पॉइंटचा कर्मचारी रावत यानेच एका दलालाला हाताशी धरून अनेक वाहनांचा अपहार करून त्यांची ५० हजार ते सव्वा लाखांच्या किमतीमध्ये विक्री केल्याचे आढळले.
हा प्रकार कंपनीच्या मालकाच्या परस्पर झाल्याने त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती. ज्या दुचाकीच्या मालकांनी कर्ज थकवले आहे, त्यांची वाहने ताब्यात घेऊन ती कंपनीच्या काल्हेर, भिवंडीतील गोदामात जमा करण्याचे काम रावतकडे होते. ही वाहने जमा केल्यानंतर त्याची मेलद्वारे माहिती देण्याचे कामही त्याच्याकडे होते. याचाच फायदा घेऊन रावतने अजगर या दलालाच्या मदतीने हप्ते न भरलेल्या मोटारसायकली उचलून त्याची कंपनीला कोणतीही माहिती न देता त्यांची परस्पर विक्री केली. विक्री केलेल्या वाहनांची रक्कम कंपनीच्या कर्जखात्यामध्ये जमा न करता त्यांनी अपहार केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी ६ जुलै रोजी कंपनीने नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच ७ जुलै रोजी रावत आणि खान या दोघांनाही अटक करण्यात आली.
त्यांनी चोरी करून परस्पर विक्री केलेल्या सहा लाख २५ हजारांच्या १७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनाही सुरुवातीला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांची कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. साई पॉइंटचे सुमारे १२ हजार कर्जदार ग्राहक असून त्यातील चार हजार ग्राहक हे थकबाकीदार आहेत. आतापर्यंत १७ मोटारसायकली मिळाल्या आहेत. आणखी ४० ते ५० मोटारसायकलींची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आणखी मोटारसायकलींची विक्री झाल्याची शक्यता चंद्रकांत जाधव यांनी वर्तविली आहे.
नवीन किंवा जुने वाहन खरेदी करण्यापूर्वी त्या वाहनाच्या नोंदीसंदर्भातील कायदेशीर बाबी ग्राहकांनी तपासणे आवश्यक आहेत. ग्राहकांनी सतर्कता ठेवल्यास अशा चोरीच्या वाहनांच्या खरेदीविक्रीला आळा बसू शकतो.
- चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
नौपाडा पोलीस ठाणे