कर्जाचे आमिष दाखवून ठाण्यातील व्यापाऱ्याची दोन कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:56 PM2020-02-13T22:56:16+5:302020-02-13T23:00:31+5:30
एका व्यापा-याला सहा कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी त्याच्याकडून दोन कोटींची रक्कम घेणा-या विनोद झा आणि अमित यादव या दोघांना मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील एका व्यापा-याला सहा कोटींचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी त्याच्याकडून दोन कोटींची रक्कम घेणाºया विनोद झा आणि अमित यादव या दोघांना मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांच्या मदतीने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी ताब्यात घेतले. या दोघांनाही आणण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशात रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील एका व्यापाºयाची दोन कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे एका व्यापाºयाने १२ फेब्रुवारी रोजी केली होती. तिची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. या व्यापाºयाला विनोद आणि अमित यांनी सहा कोटींचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी काही कागदपत्रे आणि दोन कोटींच्या अनामत रकमेची गरज असल्याचे त्यांनी त्याला सांगितले. आपल्याला थेट सहा कोटींचे कर्ज मिळणार असल्यामुळे तसेच हे दोघेही या व्यापाºयाच्या ओळखीतील असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा विश्वास बसला. दोन कोटींची अनामत त्यांच्या सांगण्यावरून व्यापाºयाने आरटीजीएस केली. ती मिळताच दोघांनीही ती घेऊन ठाण्यातून मध्य प्रदेशात पलायन केले. नंतर, या व्यापाºयाने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली. याप्रकरणी तक्रार दाखल होण्यापूर्वीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने खबरी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विनोद आणि अमित यांचा शोध घेतला. तेव्हा ते बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असून मुंबईतून दरभंगा येथे जाणाºया पवन एक्स्प्रेसमधून ते पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याच आधारे एका हमालाकडून ओळख पटवून या दोघांचीही माहिती खंडवा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक महेंद्र कुमार खोजा आणि रेल्वे पोलिसांना देण्यात आली. तिच्या आधारे खंडवा रेल्वेस्थानकात पवन एक्स्प्रेस थांबताच रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकांनी विनोद आणि अमित या दोघांनाही १२ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ही दोन कोटींची रोकडही हस्तगत केली आहे. ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांचे पथकही त्यांना घेण्यासाठी मध्य प्रदेशात रवाना झाले असून या दोघांनाही मध्य प्रदेश न्यायालयाच्या परवानगीने लवकरच ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.