फेरीवाल्यांकडून दोन कोटींचा हप्ता ( जोड बातमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:22+5:302021-09-02T05:26:22+5:30
यापूर्वी ठाणे शहरात मराठी फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय होती. मागील तीन ते चार वर्षांपासून कुर्ला, डोंगरीबरोबरच छत्तीसगडवरून येणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या ...
यापूर्वी ठाणे शहरात मराठी फेरीवाल्यांची संख्या लक्षणीय होती. मागील तीन ते चार वर्षांपासून कुर्ला, डोंगरीबरोबरच छत्तीसगडवरून येणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. या फेरीवाल्यांना राजाश्रय देण्यासाठी काही मंडळी सक्रिय असून, अशा फेरीवाल्यांना धंदा करता यावा या उद्देशाने त्यांच्याकडून हप्ते बांधून घेतले जात आहेत.
१०० रुपये प्रतिदिन हातगाड्या भाड्याने
इतर राज्यातून यायचे, फेरीवाला दादापर्यंत पोहोचायचे. त्यानंतर त्याच्याकडून हातगाडी भाड्याने घ्यायची. दिवसाला एका हातगाडीला १०० रुपये भाडे हे फेरीवाले देतात. वागळे किंवा इंदिरा नगरसह इतर काही महत्त्वाच्या भागात या भाड्यातून फेरीवाला दादा महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. या गाड्या पकडल्या गेल्या तरी त्यांची मोडतोड होणार नाही, याची काळजी हेच फेरीवाला दादा, पालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी घेतात.
कारवाई टाळण्यासाठी केवळ मेसेज
स्टेशन परिसर किंवा जांभळी नाका, आदींसह इतर ठिकाणी रस्ते किंवा फूटपाथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक येत असेल तर त्याची माहिती आधीच अतिक्रमण विभागातील कर्मचारी फोनवरून मेसेज करून फेरीवाल्यांच्या म्होरक्याला देतात. त्यानंतर गाडी येण्यापूर्वीच फेरीवाले सामान घेऊन गायब होतात. ही माहिती देण्याचा हप्ता रोजच्या रोज ठरलेला असतो. त्यापोटी प्रत्येक फेरीवाल्याकडून वेगवेगळ्या एरियानुसार १० ते १०० रुपयांपर्यंत हप्ता वसूल केला जातो.
तरीही कारवाई का?
रोजच्या रोज फेरीवाल्यांकडून हप्ता जात असतो, तसेच पालिकेकडून रोजच्या रोज २० रुपयांची पावती प्रत्येक फेरीवाल्याकडून फाडली जात असते. एखादा दिवस हप्ता चुकला तर कारवाई होते. हप्ता देऊनही कारवाई होत असल्याने फेरीवाला संघटनांनी नाराजी व्यक्त केली.
..........