दुकानदारांना दिली दोन दिवसांची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:30 AM2019-09-24T00:30:46+5:302019-09-24T00:30:57+5:30
कल्याण-बदलापूर रस्ता : आयुक्तांसोबत झाली बैठक
उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाºया दुकानदारांनी पर्यायी जागेसाठी न्यायालयात धाव घेतल्याने हे काम चार वर्षांपासून रखडले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासोबत या दुकानदारांची बैठक झाली. यामध्ये दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
कल्याण-बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणात एक हजार दुकानदार बाधित झाले आहेत. यातील २७ दुकानदार पर्यायी जागेसाठी न्यायालयात गेल्याने चार वर्षांपासून हे काम थांबले आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने वारंवार अपघात होत असून अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने न्यायालयात गेलेल्या दुकानदारांच्या अनेकदा बैठका झाल्या. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्यासह महापौर, उपमहापौर यांच्यासोबत व्यापाºयाच्या बैठका घेत मध्यममार्ग काढण्याची विनंती महापालिकेने केली. मात्र, यातून मार्ग न निघाल्याने आयुक्त देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मध्यंतरी महापौर पंचम कलानी, आमदार ज्योती कलानी यांच्यासह माजी आमदार कुमार आयलानी व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना साकडे घालून रस्त्याच्या पुनर्बांधणीची मागणी केली. महापौर न्यायालयात गेल्याने नवीन विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणाचा आदेश पालिका प्रशासनाला दिला. महापालिकेने रस्तारुंदीकरणाच्या आड येणाºया दुकानदारांना जागा मालकीबाबत पुरावे सादर करण्याचे सांगितले. तसेच, दुकानदारांच्या याचिकेवर एकतर्फी निर्णय देऊ नका. यासाठी विधी विभागाने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. पावसाने विश्रांती घेताच आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेत कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीचे संकेत दिले. यातूनच दुकानदारांसोबत बैेठक घेऊ न शहर विकासाच्या आड न येण्याची विनंती आयुक्तांनी दुकानदारांना केली.
रस्त्याप्रकरणी आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसांत निर्णय कळवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा व्यापाऱ्यांना दिल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन डीपीनुसार रुंदीकरण - उपायुक्त
कल्याण ते बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण शहरविकास आराखड्यानुसार होणार आहे. रस्ता सर्वेक्षणाचे काम स्थानिक नगररचनाकार यांना दिले जाणार असून बाधित होणाºया दुकानदारांना मार्किंग व नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. तसेच आयुक्तांनी न्यायालयात गेलेल्या दुकानदारांसोबत चर्चा करून दोन दिवसांत निर्णय कळवण्याचे सांगण्यात आल्याचे उपायुक्त संतोष देहरकरांनी सांगितले.