ठाण्यातील पूर्व भागात शिवकालीन शस्त्रांचे दोन दिवसीय प्रदर्शन, शिवदुर्ग ग्रुपतर्फे प्रदर्शनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 04:42 PM2018-03-05T16:42:30+5:302018-03-05T16:42:30+5:30
ठाणे पूर्व मधील पारशीवाडीतील "शिवदुर्ग ग्रुप" हा तरुणांचा समुह गेली काही वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन गडकोट संवर्धन, किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग, दुर्गभ्रमण अशा अनेक उपक्रमातून तो इतिहास अभ्यासण्याचा, जपण्याचा व इतर तरुणांनाही त्याचे महत्त्व समजून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे.
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे (तिथीप्रमाणे) औचित्य साधून शनिवार १० व रविवार ११ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध शस्त्रसंग्रहक व अभ्यासक जोसेफ लोपीस यांच्या संग्रहातील शस्त्रांचे प्रदर्शन ठाणे पूर्व येथील कोपरी विभागात आयोजित केले आहे.
प्रत्येक नागरिकाला इतिहासाजवळ नेऊन त्या इतिहासाबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी काही करावं असच आमच्यातील प्रत्येकाला वाटतं आणि ते इतिहासकालात वापरलेल्या वस्तू प्रत्यक्ष दाखविल्याने सहजरित्या साध्य होऊ शकते असे आम्हाला अनुभवावरुन जाणवते आणि त्यातूनच यंदा शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरले. शिवछत्रपतींच्या काळात युद्धे प्रत्यक्षात कशी केली जात होती, प्रत्येक मावळ्याची शस्त्रसंपदा काय होती या व अशा अनेक गोष्टी या शस्त्रांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर स्पष्ट होतील. शिवकाळात महाराजांशी निगडीत काही गोष्टींचे आजही जनसामान्यांना अप्रूप वाटते.जसे शिवरायांनी वापरलेली भवानी तलवार आणी अफजलखान वधाच्या वेळेस वापरलेले गुप्त शस्त्रे बिछवा-वाघनखे हे तर आहेतच पण तलवार,भाले,पट्टा अशी व अनेक शस्त्रे आपणांस पहावयास मिळतील असे शिवदुर्ग ग्रुपतर्फे सांगण्यात आले. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी आणि आपल्या ज्वलंत इतिहासाशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करा. प्रदर्शनास आपणा सर्वांची भेट हीच आमच्या प्रयत्नांची फलशृती आहे असे या ग्रुपच्या तरुणांनी सांगितले. हे प्रदर्शन सकाळी १०:०० ते रात्रौ १०:०० यावेळेत वसंत पाटिल चाळ, पारशीवाडी, जुने कोपरी पोलिस स्टेशन जवळ ठाणे (पु) ४०० ६०३ येथे आयोजित केले आहे.