लाचखोर घरतच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:13 AM2018-06-18T06:13:22+5:302018-06-18T06:13:22+5:30
केडीएमसीचा अतिरिक्त आयुक्त लाचखोर संजय घरत आणि अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
कल्याण : केडीएमसीचा अतिरिक्त आयुक्त लाचखोर संजय घरत आणि अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. घरत हा तपासकामात सहकार्य करत नसल्याची माहिती रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात देण्यात आली. यावर पोलीस कोठडी वाढवण्यात यावी, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. ही विनंती जिल्हा सत्र न्यायाधीश एन.एम. वाघमारे यांनी मान्य करत तपासकामी आणखीन दोन दिवसांची कोठडी सुनावली.
अतिरिक्त आयुक्त घरत याला बुधवारी आठ लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आली. त्याच्यासह ललित आमरे आणि भूषण पाटील या लिपिकांनादेखील अटक केली आहे. तिघांना गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता घरत हा तपासकामात सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. घरत हा त्याच्याकडील दोन मोबाइलमधील पासवर्डची माहिती देत नसल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले होते. संबंधित अधिकाºयांनी तपासकामी जास्तीतजास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली असता आरोपींना त्यावेळी तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.
या प्रकरणात नारायण परुळेकर या आणखी एकाला अटक करण्यात आली होती; परंतु त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना पुन्हा कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश एन.एम. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी घरत हा तपासकामात सहकार्य करत नसल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त दीपक दळवी यांच्या वतीने पुन्हा सांगण्यात आले. घरत याच्याजवळील दोन मोबाइलचे पासवर्ड त्याच्याकडून सांगितले जात नसल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले.
>त्या मोबाइलमध्ये दडलेय काय?
घरत याच्यासह अन्य दोघांना अटक करून पाच दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, आतापर्यंत झालेल्या तपासकामातून कोणतीही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेली नाही. अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तपासकामात सहकार्य केले जात नसल्याकडे लक्ष वेधत घरतच्या मोबाइल पासवर्डचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.