ठाण्यात दोन दिवसीय दृष्टीहीन खेळाडुंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 23, 2022 03:56 PM2022-11-23T15:56:59+5:302022-11-23T15:57:33+5:30
राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा उत्साहात रंगणार आहे.
ठाणे : दृष्टीहीनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठाणे शहरात दोन दिवसाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत १२० हून अधिक दृष्टीहीन खेळाडू सहभागी होऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचे दर्शन ठाणेकरांना घडणार आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि विहंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी रेमंडच्या मैदानावर रंगणार आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा माधवी डोळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा उत्साहात रंगणार आहे. पहिल्या दिवशी चार तर दुसऱ्या दिवशी तीन संघांची मॅच होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. या स्पर्धा सुरू होणार असून एकूण सात सामने या स्पर्धा अंतर्गत खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेचे समाचोलचन देखील दृष्टीहीन व्यक्तीच करणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वा. या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
रोख रक्कम आणि ट्रॉफी या स्वरूपामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्या संघाला तसेच, ‘मॅन ऑफ द मॅच’, ‘मॅन ऑफ द सिरीज’, ‘उत्कृष्ट बॅट्समन’, ‘उत्कृष्ट बॉलर’, ‘उत्कृष्ट फिल्डर’म्हणून सन्मानित केले जाणार आहे. खेळाडूंना वैद्यकीय सेवा देखील पुरवले जाणार आहे. यावेळी या स्पर्धांच्या समन्वयक नेहा निंबाळकर,पियाली आलेगावकर आदी उपस्थित होत्या.