दोन दिवसांनी पाडणार पत्रीपूल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:05 PM2018-08-22T23:05:47+5:302018-08-22T23:06:15+5:30
वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेला कल्याणचा जुना पत्री पूल पाडण्याची कारवाई दोन दिवसांनी सुरु केली जाणार आहे
कल्याण : वाहतुकीसाठी अतिधोकादायक असलेला कल्याणचा जुना पत्री पूल पाडण्याची कारवाई दोन दिवसांनी सुरु केली जाणार आहे. याठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम सुरु होणार असून, त्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
जुन्या पत्री पुलासंदर्भात मंगळवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राम जैस्वार यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त, रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. जुना पत्री पूल वाहतुकीसाठी तीन दिवसांकरीता बंद राहिल. पुलावरील महापालिकेचे पथदिवे, वीजवितरण कंपनीच्या केबल्स आणि अन्य सेवावाहिन्या काढून घेण्याची कारवाई तीन दिवसांमध्ये केली जाईल. पूल पाडण्याचे काम तीन दिवसांनी हाती घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेला नवा पूल आणि जुना पूल या दोहोंमध्ये नवा पूल प्रस्तावित आहे. रेल्वेकडून मंजुरी आल्यानंतर पूल पाडल्यापासून पंधरा दिवसाच्या आत नव्या पुलाच्या कामाला सुरुवात होईल. नव्या पुलाचे काम तीन ते चार महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या कामासाठी खर्चाच्या तरतुदीची समस्या नाही. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आलेली आहे. याच खर्चातून नवा पूल उभारणे प्रस्तावित आहे. हे काम तातडीने पूर्ण केले जाईल. जुना पत्री पूल पाडल्यानंतर दरम्यानच्या काळात या पुलावरील हालक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार का, असा सवाल पोलिस यंत्रणेकडे उपस्थित केला असता, पर्यायी मार्गच नसल्याने आहे नव्या पूलावरुनच वाहतूक सुरु राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पत्री पूल होणार इतिहासजमा : जुना पत्री पूल १९१४ साली ब्रिटिशांनी उभारला होता. १०४ वर्षे जुना हा पूल म्हणजे शहराची ओळख आहे. काळाच्या ओघात नागरीकरण वाढले. लोकसंख्या वाढली. सोबतच वाहनांची संख्याही वाढली. त्याचा ताण पत्री पुलावर आला. त्यामुळे पूल धोकादायक झाला. मात्र १०४ वर्षे तग धरून असलेला हा पूल ब्रिटिशांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा नमुना आहे. ब्रिटिशांनी बांधलेल्या पत्री पुलाची योग्य देखभाल ठेवण्यात आली नाही. त्यामुळे हा पूल तोडण्याची वेळ आली.