पिसे पंपिंग स्टेशनमध्ये गवत अडकल्याने ठाण्यात दोन दिवस कमी दाबाने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:19+5:302021-07-20T04:27:19+5:30
ठाणे : पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला असून नदीतील पुराच्या पाण्यासोबत पानवेली व गवत वाहत येऊन ...
ठाणे : पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला असून नदीतील पुराच्या पाण्यासोबत पानवेली व गवत वाहत येऊन पिसे येथील पंपिंग स्टेशनमध्ये अडकल्याने पंपाद्वारे होणारा पाण्याचा उपसा कमी झाल्यामुळे पिसे येथून कमी पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरातील सर्व भागांत सोमवारपासून पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती ठामपाच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये रोज ४८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होता. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २१० दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून ११० दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेकडून ६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिका स्वतःच्या योजनेसाठी भातसा नदी पात्रातून पाणी उचलते. महापालिकेचे भातसा नदी पात्रावर पिसे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातील पंपाच्या साह्याने महापालिका भातसा नदी पात्रातून पाणी उपसा करते आणि शहरात पुरवठा करते.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातसा नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्यासोबत पानवेली आणि नदीतील गवत वाहत येऊन ते पिसे जलशुद्धीकरण केंद्रातील पंपामध्ये अडकले आहे. यामुळे नदी पात्रातून पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पुढील दोन दिवस ही समस्या कायम राहणार आहे.
........
वाचली