मानसिक व बौद्धिक वाढीकरिता शिक्षकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:36 PM2020-09-18T15:36:26+5:302020-09-18T15:36:41+5:30
शिक्षण विभाग राज्य शासन व विपश्यना विशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आनापान साधना वर्ग सुरू आहे. सर्व माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीकरिता उपयुक्त आहे.
कल्याण - कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण पद्धत सुरू आहे. ऑनलाइन शिकविण्यासाठी शिक्षक खूप मेहनत घेत आहेत. ही मेहनत घेत असताना मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ बळकट करण्यासाठी आनापान साधना वर्ग घेण्यात येणार आहे.
शिक्षण विभाग राज्य शासन व विपश्यना विशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आनापान साधना वर्ग सुरू आहे. सर्व माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीकरिता उपयुक्त आहे. सध्याच्या कोरोना सारख्या महामारीच्या प्रसंगी समाजातील प्रत्येक घटक अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मन शांत आणि संतुलित राहणे खूप गरजेचे आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी भय व तणाव अशा अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत असल्याने या मानसिक स्थितीशी सामना करण्यासाठी व मनोबल प्राप्त करण्यासाठी आनापान साधनेचा लाभ शिक्षक व अधिकारी या सर्वांना होऊ शकतो. मित्र उपक्रमांतर्गत २४ व २५ सप्टेंबर रोजी सकाळी सात ते नऊ दरम्यान दोन तासाचे ऑनलाइन पद्धतीने यूट्यूबद्वारे आनापान साधनेचे प्रशिक्षण विपश्यना विशोधन केंद्र इगतपुरी यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व शिक्षक व अधिकारी वर्गासाठी आयोजित केले आहे.
कोरोनाच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांना मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे. मी स्वतः विपश्यना केंद्र इगतपुरी येथे दोन वेळा दहा दिवसाचे मेडिटेशन शिबिर केलेले आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण फारच महत्त्वपूर्ण असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनापान प्रशिक्षण करावे, असे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी सांगितले.