दोन दिवस पाणीकपात
By admin | Published: November 6, 2016 04:15 AM2016-11-06T04:15:08+5:302016-11-06T04:15:08+5:30
दिवाळी संपताच दरवर्षी १५ टक्के पाणीकपात करून जुलैपर्यंत पाणी पुरवणाऱ्या लघू पाटबंधारे विभागाने यंदा पाऊस चांगला होऊनही सात टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय
ठाणे : दिवाळी संपताच दरवर्षी १५ टक्के पाणीकपात करून जुलैपर्यंत पाणी पुरवणाऱ्या लघू पाटबंधारे विभागाने यंदा पाऊस चांगला होऊनही सात टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे. त्यासाठी दर आठवड्याला बारा तास पाणीपुरवठा बंद ठेवावा, असे त्यांनी ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांना सुचवले आहे. मात्र असे पाणी बंद न ठेवता सरसकट दोन दिवस २४ तास पाणीपुवठा बंद ठेवण्याचा पर्याय पालिकाना सोयीचा असून त्यानुसार महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहील.
ठाणे महापालिकाने तसा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानुसार ठाण्याचा पाणी पुरवठा मंगळवारी आणि कळवा, मुंब्य्राचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ठाण्यासह जिल्ह्यातील विविध भागांना पाणी कपातीच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. काही भागांत तर चार, चार दिवस पाणी नसल्याने नागरिकांचे हाल झाले होते. कल्याण-डोंबिवलीत आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद होता. मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर पालिकेतील परिस्थिती भीषण बनली होती. उल्हासनगरमध्ये पाणी पळवू नये म्हणून जलकुंभांचे रक्षण करण्याची वेळ आली होती.
यंदा तुलनेने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आणि जिल्ह्यातील बहुतेक सर्व धरणे १०० टक्के भरल्यानंतरही पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. लघु पाटबंधारे विभागाने त्यासाठी परिपत्रक काढले असून प्रत्येक महापालिकेने महिन्यातून चार वेळा सात टक्के पाणीकपात करावी, अशा सूचना दिल्या आहेत. ते प्रत्येक महापालिकेला पाठविण्यात आले आहे. कपात केलेले पाणी शेतीसाठी वापरले जाणार असून त्यासाठीच ही कपात लागू केल्याची माहितीही या विभागाने दिली आहे. पाणी कपातीचे नियोजन कसे करणार हे प्रत्येक पालिकेला कळवावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
आठवडाभरात इतरांचेही वेळापत्रक
ठाणे महापालिकेने पाणीकपातीचे नियोजन ठरविल्याने त्या पाठोपाठ प्रत्येक महापालिकेला येत्या आठवडाभरात आपापले कपातीचे वेळापत्रक ठरवावे लागणार आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून पुन्हा ठाणे जिल्हा पाणीकपातीच्या फेऱ्यात अडकणार आहे.
ठाण्याचा पुरवठा ८ नोव्हेंबरला बंद
स्टेमच्या शहाड येथील अशुद्ध पाण्याच्या वाहिनीला गळती लागल्याने वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी, तसेच ठाणे पालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांची दुरु स्ती, पंपिंग स्टेशनमधील दुरु स्तीसाठी ठाण्याला होणारा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी ८ नोव्हेंबरला सकाळी ९ ते बुधवार सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
सक्ती दहा दिवसांनंतर
सध्या प्रत्येक महापालिका मंजूर कोट्यापेक्षा पाच ते दहा टक्के जादा पाणी उचलत आहेत. तसे त्यांनी यापुढेही केले आणि जादा पाणी उचलण्याचे प्रमाण १५ टक्कयांवर गेले तर त्या पालिकांना दंड ठोठावला जाईल, असा इशारा लघू पाटबंधारेने दिला आहे. अजून पाणीकपातीची सक्ती लागू केलेली नाही. ती १५ नोव्हेंबरनंतर अस्तित्वात येईल. मात्र जादा पाणी उचलण्याच्या बदल्यात महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी जुलैपर्यंत पुरवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे आश्वासन पालिकांनी दिल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले.
ठाण्यात पुन्हा मंगळवार-शुक्रवार
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र मिळाल्याने त्यांनी आढावा घेतला. महिन्यातून चार वेळा सात टक्के पाणीकपात करणे म्हणजे १२ तासांचे शटडाऊन चार वेळा घ्यावे लागणार आहे. तसे न करता ठाणेकरांचे पाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी महिन्यात दोनदा २४ तासांचे शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचे नियोजन आता सुरु करण्यात आले असून महिन्यातून दोन वेळा कळवा, मुंब्रा आणि तसेच महिन्यातून दोन वेळा ठाण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. कळवा, मुंब्य्रात शुक्रवारी शटडाऊन घेतले जाणार असून ठाण्यात मंगळवारी शटडाऊन घेतले जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.