कळव्यातील मृत्यूतांडव; दोन डॉक्टर निलंबित; नोटिसीला असमाधानकारक उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:55 AM2023-12-25T05:55:47+5:302023-12-25T05:57:18+5:30
या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे ( Marathi News ): महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या समितीने दिलेल्या नोटिशीला समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोघा डॉक्टरांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर सहयोगी प्राध्यापक डॉ. दीपा बंजन आणि सहायक प्राध्यापक डॉ. महेश मोरे यांचे महापालिकेने निलंबन केले आहे.
कळवा रुग्णालयात १२ ऑगस्टला रात्री १०:३० ते १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० पर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. त्याआधीही १० ऑगस्टला एकाच दिवसात रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ घडलेल्या या मृत्युकांडामुळे विरोधी पक्षासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली होती. १३ रुग्ण हे अतिदक्षता विभागातील आणि पाच रुग्ण सर्वसाधारण वॉर्डमधील होते. दाेघांनीही समाधानकारक उत्तरे न दिल्याने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.
दोघांची होणार विभागीय चौकशी
मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांना शेवटच्या क्षणी आणल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉ. बारोट यांनी घेतला होता. मात्र, या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांसह पाच जणांची चौकशी समिती नेमून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. समितीचा अहवाल येऊनही त्यावर कार्यवाही झाली नव्हती. त्यानंतर अधिवेशनातही दोषींवर कारवाईचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी सुरू राहील, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.