heatstroke:तीव्र उन्हाळ्याच्या मुक्या प्राण्यांनाही झळा, उष्माघाताने ठाण्यात दोन श्वानांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:55 AM2022-04-08T05:55:42+5:302022-04-08T05:56:10+5:30

Thane News: तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

Two dogs die of heatstroke in Thane | heatstroke:तीव्र उन्हाळ्याच्या मुक्या प्राण्यांनाही झळा, उष्माघाताने ठाण्यात दोन श्वानांचा झाला मृत्यू

heatstroke:तीव्र उन्हाळ्याच्या मुक्या प्राण्यांनाही झळा, उष्माघाताने ठाण्यात दोन श्वानांचा झाला मृत्यू

googlenewsNext

- प्रज्ञा म्हात्रे
 ठाणे : तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची  दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे.

१५ दिवसांत १७ पक्ष्यांना उष्माघाताचा फटका बसला असून, ते एसपीसीए रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, तर कँप  फाउंडेशनला आठवड्याला ३५ आजारी पशू-पक्षी आढळत आहेत. यात मुख्यत्वे श्वान आणि मांजरींचा समावेश आहे. उष्माघातामुळे दोन श्वानांचा मृत्यूही झाल्याचे फाउंडेशनने सांगितले.

मार्च महिन्यात ठाण्यात तापमानाने चाळिशी गाठली असल्याने पक्षी व प्राण्यांना उष्माघाताचा फटका बसला. त्यांना पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्याच्या शोधत असताना पोटातील पाणी कमी होऊन त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडतात. पक्ष्यांच्या पंखांना जखम होण्याचे प्रमाण अधिक असते.

१५ दिवसांत एसपीसीए रुग्णालयात १७ पक्षी उपचारासाठी दाखल झाले. यात पाच घार, पाच घुबड, चार ससाणे, दोन कावळे आणि एक कोकिळा यांचा समावेश आहे. कँप फाउंडेशनकडे ठाणे, मुलुंड, भांडुप, कळवा, भिवंडी येथून मांजर आणि श्वानांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे फोन येत आहेत.
ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांनी उन्हामुळे त्यांचे पूर्ण केस काढले असतील तर उलट प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्या शरीराला चटके लागून त्यांना उष्माघाताचा झटका येऊ शकतो. उन्हात बाहेर पडल्याने प्राणी बेशुद्ध पडल्याच्या दोन घटना घडल्याचे फाउंडेशनचे सुशांक तोमर यांनी सांगितले. रस्त्यांत जाताना सुद्धा एखादा पक्षी आजारी दिसल्यास नागरिकांनी फाउंडेशनला कळवावे, असे आवाहन केले आहे.

प्राणी, पक्ष्यांसाठी हे अवश्य करा
प्राणी, पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे. प्राण्यांना सावलीत जागा द्यावी. त्यांची विशेष काळजी घ्यावी.
गेल्या १५ मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्यापासून पक्ष्यांचे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यांना सलाईनद्वारे, तोंडावाटे औषधे दिले जात आहे. जखमींचे ड्रेसिंग केले जात आहे. 
- डॉ. सुहास राणे
एसपीसीए रुग्णालय

कँप फाउंडेशनकडे दिवसाला चार ते पाच म्हणजेच आठवड्याला ३५ फोन येत आहेत. यात पाणी न मिळाल्याने दोन श्वानांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळा वाढल्याने पाळीव प्राण्यांना बाहेर काढू नये. ठिकठिकाणी त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि त्यांना सावलीत बसण्यासाठी जागा द्यावी.
- सुशांक तोमर, कँप फाउंडेशन.

Web Title: Two dogs die of heatstroke in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.