उल्हासनगर तहसील सेतू कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना २०० रुपयांची लाच घेतांना अटक
By सदानंद नाईक | Published: May 19, 2023 05:08 PM2023-05-19T17:08:39+5:302023-05-19T17:10:11+5:30
विभागाने सापळा रचून दोघांना लाच घेतांना रंगेहात अटक केली.
सदानंद नाईक, उल्हासनगर : तहसील सेतू कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना एका विधवा महिलेकडे उत्पन्नाचा दाखला काढून देण्याच्या मोबदल्यात २०० रुपयांची लाच मागितली. महिलेने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर गुरवारी विभागाने सापळा रचून दोघांना लाच घेतांना रंगेहात अटक केली.
उल्हासनगर तहसीलदार कार्यालयातील सेतू नागरी सुविध केंद्रात कंत्राटी कामगार असलेले सानप व सुर्यवंशी हे विविध दाखले देण्याच्या बदल्यात सर्रासपणे गोरगरीब व गरजू नागरिकांकडून पैसे उखळत असल्याची चर्चा होती. दरम्यान एका ६० वर्षीय विधवा महिलेला संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला हवा होता. महिलेने त्यासाठी तहसीलदार सेतू नागरी केंद्र कार्यालयात अर्ज केला होता. सेतू कार्यालयातील राजेंद्र सानप आणि सहदेव सूर्यवंशी यांनी दाखल्याच्या मोबदल्यात २०० रुपयाची मागणी महिलेकडे केली. महिलेला या प्रकारचा राग येऊन, तिने थेट ठाणे अँटी करप्शनला माहिती दिली. त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक, अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्या पथकाने गुरवारी सापळा रचून सेतू कार्यालयातील राजेंद्र सानप आणि सहदेव सूर्यवंशी यांना २०० रुपयांची विधवा महिलेकडून लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. सेतू नागरी केंद्रातून सर्रासपणे पैसे घेतले जात असल्याची चर्चा असतांना, तहसीलदारांनी यापूर्वीच कारवाई करायला हवी होती. असे नागरिकांचे म्हणणे आहे.