अतिधोकादायक गोडसे इमारतीचे दोन मजले निष्कासित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 07:00 PM2019-08-09T19:00:57+5:302019-08-09T19:06:57+5:30
पार्वती इमारतधारकांचा दुरुस्ति करण्याचा दावा; प्रभाग क्षेत्र अधिकारी निर्णयावर ठाम
डोंबिवली - पश्चिमेकडील अतिधोकादायक गोडसे इमारतीमधील दुस-या मजल्यावरील एका घरातील प्लास्टर अंगावर पडुन विकास फडके यांचा मृत्यू झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने गुरुवारपासून ती इमारत निष्कासीत करण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी दोन्ही मजले पाडण्यात आले असून संध्याकाळी गाळे पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी ते काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ह प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे हे घटनास्थळी असून ठेकेदाराचे ३० कामगार, महापालिकेचे १० कर्मचारी, आणि महापालिकेचे ९ पोलीस आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याचे ५, आणि वाहतूक विभागाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या सगळयांच्या माध्यमातून ती इमारत पूर्णपणे निष्कासीत करण्याचे काम सुरु होते. ते म्हणाले की, सर्व रहिवासी,गाळेधारक यांना भोगवटाप्रमाणपत्र देण्यात आले असून कोणाचेही तेथे सामान नाही. गाळेधारकांनाही सामान काढण्याचे आदेश दिले होेते, त्यानूसार गाळेधारकांनीही सामान काढले, आणि पाडकाम जलद गतीने पुढे सरकल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी बहुतांशी काम झाले असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महात्मा फुले रस्ता महात्मा गांधी शाळेपर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच पादचा-यांनाही शक्यतोवर तेथून जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले होते. तरीही परिसरातच बहुतांशी इमारती असल्याने अनेकांना तेथून बाजुला करतांना प्रशासनाच्या नाकीनऊ आले होते.
दरम्यान, पूर्वेकडील पाटकर रस्त्यालगत असलेल्या पार्वती या तीन मजली इमारतीला गुरुवारी रात्री महापालिकेने सील ठोकले होते. त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून रहिवासी, गाळेधारकांनी ठाण मांडले होते. इमारतीला धोका नाही असा दावा करत ते म्हणाले की, महापालिकेने मार्गदर्शन करावे आणि त्यानूसार आम्ही दुरुस्ति करायला तयार आहोत. परंतू महापालिकेचे फ प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, त्या ४२ वर्ष जुन्या इमारतीची डागडुजी करता येणे शक्य नाही. तसेच ती इमारत जीर्ण झाली असून तिस-या मजल्यावरील गॅलरीला बांबुचा आधार देण्यात आला आहे. तरीही इमारत निष्कासीत करु नका अशी भूमिका तेथील धारक कसे काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला. ती इमारत निष्कासीत करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून अल्पावधीतच अंतिम निर्णय घेतला जाईल असेही शिंदे म्हणाले.