दोन फुटी घोरपड दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:25+5:302021-09-16T04:51:25+5:30
ठाणे: लोकवस्तीत अनाहूतपणे शिरलेल्या घोरपडीला दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या मदतीने प्राणीमित्रांनी सापळा रचून ...
ठाणे: लोकवस्तीत अनाहूतपणे शिरलेल्या घोरपडीला दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या मदतीने प्राणीमित्रांनी सापळा रचून बुधवारी यशस्वीरित्या पकडले. तिला पकडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ठाणे मार्केट परिसरातील जवाहर बाग अग्निशमन दलाच्या केंद्राजवळील शंकर महागिरी चाळीच्या गटारामध्ये घोरपड असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यांनी प्राणीमित्र संघटनेला पाचारण करून तिला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही ती हाती लागली नव्हती. दोन दिवस तिला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना बुधवारी अखेर ती रचलेल्या सापळ्यात अडकली. ती गटाराच्या मार्गानेच त्याठिकाणी आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिला प्राणीमित्र संघटनेच्या मदतीने येऊरच्या जंगलात सोडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वीही एका घरात घोरपड आसऱ्यासाठी आली होती. तिलाही प्राणीमित्रांनी पकडल्याचे सांगण्यात आले.
---------------