मुंबई ठाण्यासह पाच जिल्हयातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना अटक, दोघांवर अनेक गुन्हे दाखल
By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2022 07:44 PM2022-09-18T19:44:06+5:302022-09-18T19:44:19+5:30
कोपरी आणि श्रीनगर पोलिसांची कामगिरी.
ठाणे : मुंबई ठाण्यासह पाच जिल्हयातून तडीपार केलेल्या राकेश उर्फ राक्या प्रेमचंद गुरूदासान (२६, रा. कशेळी, भिवंडी, ठाणे) आणि साई उर्फ दशरथ हराळे (२६, रा. वागळे इस्टेट, ठाणे ) या दोन गुंडांना अनुक्रमे कोपरी आणि श्रीनगर पोलिसांनी पुन्हा अटक केली. या दोघांवरही दोघांवर कलम १४२ नुसार कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी रविवारी दिली.
राकेश उर्फ राक्या गुरूदासान वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी ठाण्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या जिल्हयातील महसूल हट्टीतून एक वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश दिले होते. तरीही तो पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांच्या परवानगीविना बेकायदेशीररित्या कोपरीतील सर्वोदय गार्डनचे बाजूला असलेल्या परिसरात फिरतांना कोपरी पोलिसांना १७ सप्टेंबर रोजी आढळला. त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या पथकाने अटक करुन अटक केली. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत.
त्यापाठोपाठ वागळे इस्टेट भागात मोकाट फिरणाºया साई ऊर्फ दशरथ दिनकर हराळे या तडीपार गुंडालाही श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्हयातून दोन वर्षांकरीता हद्दपार करण्याचे आदेश ८ आॅक्टोंबर २०२१ रोजी दिले होते. तरीही त्याने पोलीस उपायुक्तांच्या आदेशाचा मनाई आदेशाचा भंग वागळे इस्टेट भागातील किसननगर भागात फिरतांना आढळल्याने श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस हवालदार नयना बनसोडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.