जूनअखेरीस बसवणार पत्रीपुलाचे दोन गर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:30 AM2020-06-02T00:30:51+5:302020-06-02T00:31:02+5:30
तारीख पे तारीख सुरूच : ७५ मीटर लांबीच्या गर्डरचे काम होणार आधी
अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पत्रीपुलाच्या कामाला लॉकडाउनचाही फटका बसला आहे. या पुलाचे गर्डर जूनअखेरीस बसवण्यात येणार असून, त्यादृष्टीने राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) तयार केली आहे.
पत्रीपुलावर १५-२० दिवसांत प्रथम ७५ मीटर लांबीचा गर्डर तर, त्यानंतर काही दिवसांतच दुसरा ३० मीटरचा छोटा गर्डर बसवण्यात येणार आहे. हे काम झाल्यावर गर्डरवर काँक्रिटीकरण आणि कल्याण व डोंबिवली दिशेला जोडरस्ते बनवण्यात येतील. अन्य तांत्रिक कामांना निश्चित किती वेळ लागेल, हे सांगणे सध्या अवघड असले तरी ते लवकरात लवकर करण्याचे नियोजन आहे, असे सूत्रांनी सांगितले.
लॉकडाउनमुळे या पुलाचे काम खोळंबले आहे. एमएसआरडीसीच्या नियोजनानुसार हा पूल मार्चमध्ये वाहनांसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र, या पुलाच्या कामाच्या शुभारंभापसून अनेक अडथळे आले. दुसरीकडे धोकादायक बनलेला ब्रिटिशकालीन पूल पाडल्यापासून पुलाच्या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका कल्याण आणि डोंबिवलीतील वाहनचालकांना बसला आहे.
सध्या जूनअखेरपर्यंत लोकल बंद असल्याने तोपर्यंत गर्डरचे काम पूर्ण करण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. सध्या लोकल बंद असल्या तरी मालगाड्या आणि सोमवारपासून लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या पुलावर गर्डर टाकण्यासाठी रेल्वेला ट्रॅफिक ब्लॉकचे नियोजन करावेच लागणार आहे. एमएसआरडीसीला त्यासाठी कामाचा पक्का आराखडा रेल्वेला सादर करावा लागणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. क्रेन कधी येईल हे निश्चित झाले की, ब्लॉकसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
दिल्ली किंवा हैदराबादहून येणार क्रेन
पत्रीपुलाचे ७५ व ३० मीटरचे दोन्ही गर्डर बसवण्यासाठी हैदराबाद किंवा दिल्ली येथून विशेष इलेक्ट्रीक क्रेन मागवण्यात येणार आहे. ती क्रेन कल्याणला कधी येणार, त्यावर गर्डर बसवण्याची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.