अनधिकृत जागेचा फलक लावण्यावरून दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:52+5:302021-07-08T04:26:52+5:30
डोंबिवली : एकीकडे जमीन मालकी हक्कावरून वाद असताना त्या जागेवर अनधिकृत जागेचा फलक लावल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याचा ...
डोंबिवली : एकीकडे जमीन मालकी हक्कावरून वाद असताना त्या जागेवर अनधिकृत जागेचा फलक लावल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार पूर्वेतील आयरेगाव परिसरातील केणेवाडी येथे मंगळवारी घडला. याप्रकरणी रामनगर पोलिसांत परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पवन केणे यांचा श्याम केणे, यतीन केणे, अंकुश केणे यांच्याशी जमीन मालकी हक्कावरून वाद आहे. वादग्रस्त जागेवर ‘अनधिकृत जागा’ असा फलक लावला गेला असल्याचे पवन यांना समजले. ते मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास त्या जागेवर गेले. तेथे श्याम उपस्थित होते. पवन यांनी फलक का लावला, अशी विचारणा श्याम यांना केली. न्यायालयात खटला दाखल आहे. न्यायालयाने अजून कोणताही निकाल दिलेला नाही, असेही सांगितले; परंतु श्याम यांनी फलक काढण्यास नकार दिला. त्यावेळी प्रवीण केणे, भरत केणे, अंकुश केणे हे तिघे आले. चौघांनी मिळून पवन यांना मारहाण केली. श्याम यांनी सळईने मारहाण केली. त्याचबरोबर तेथे त्याचा आलेला मुलगा यतीननेही मारहाण केल्याची तक्रार पवन यांनी रामनगर पोलिसांत केली आहे. यावरून श्याम यांच्यासह त्यांचा मुलगा यतीन, प्रवीण, अंकुश आणि भरत अशा पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
शिवीगाळ, मारहाणीची तक्रार
यतीन केणे यांनीही पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पवन केणे, कुमार आवटे, रोशन केणे आणि अनोळखी चार ते पाच व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. यतीन यांची आई आणि काकीशी वाद घालत पवन यांनी त्यांना धक्काबुक्की शिवीगाळ केली. याबाबत विचारणा केली असता पवनसह अन्य पाच ते सहा जणांनी लाथाबुक्यांनी व सळईने आपल्या डोक्यात वार केल्याची तक्रार यतीन यांनी दिली आहे.
------------------