विरोधी पक्षनेत्यावरून राष्ट्रवादीत दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:41 AM2019-11-19T00:41:44+5:302019-11-19T00:41:58+5:30
आव्हाड-मुल्ला गट आमने-सामने : ठाणे शहर विरुद्ध कळवा-मुंब्य्रातील नगरसेवकांत वाद
ठाणे : एकीकडे शिवसेनेत महापौरपदावरून वाद रंगल्याची घटना ताजी असताना आता राष्ट्रवादीमध्येही विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावे, यावरून चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे चित्र सोमवारी पाहण्यास मिळाले. अडीच वर्षे मान आता ठाण्याला मिळावा, असा हट्ट ठाण्यातील नगरसेवकांनी धरला आहे. मात्र, तो कळवा किंवा मुंब्य्राला मिळावा, यावरून खलबते रंगली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कळवा आणि मुंब्य्रातील अशा दोन नगरसेवकांना अडीच वर्षे वाटून विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या कमिटमेंटलाच पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हान दिले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद ठाण्याला मिळणार की कळवा, मुंब्य्राला यावरून चांगलाच पेच निर्माण झाला आहे.
नरेश म्हस्के यांना महापौर केल्याने देवराम भोईर अॅण्ड कंपनी नाराज झाली. हा वाद अद्यापही शांत झालेला नाही. दुसरीकडे आता विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीत वादंग निर्माण झाला आहे. हे पद कोणाकडे जावे, यासाठी सोमवारी विद्यमान विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात बैठक आयोजिली होती. तिला शहराध्यक्ष आनंद परांजपे हेसुद्धा हजर होते. यावेळी विरोधी पक्षनेतेपदाची श्रेष्ठींकडून मला कमिटमेंट असल्याचा दावा नजीब मुल्ला यांनी केला. त्यामुळे पक्षातील इतर नगरसेवक नाराज झाले. सगळी पदे तुम्हालाच कशी मिळतात, आम्ही काय नगरसेवक नाही का? त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे महिलेला मिळाले, असाही सूर लावला गेला. ते सुद्धा कळवा किंवा मुंब्य्रातील नगरसेविकेलाच मिळावे, असा जोर या पट्ट्यातील नगरसेवकांनी लावला. तर, या बदल्यात गटनेतेपद घ्यावे, असा सूरही ठाण्यातील नगरसेवकांनी लावला. मुळात ठाण्यात राष्टÑवादीचे ८ नगरसेवक आहेत. त्यातील चार तर राष्टÑवादीत असून नसल्यासारखे आहेत. दुसरीकडे कळवा-मुंब्य्रात राष्टÑवादीची ताकद आहे. त्यामुळे हा मान पुन्हा कळवा, मुंब्य्रातील नगरसेवकांना मिळावा, असा दावा येथील नगरसेवकांनी केला. मात्र, यावर एकमत होऊ न शकल्याने रागात काही नगरसेवकांनी बैठकीतूनच काढता पाय घेतला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड हे कळव्यातील नगरसेवक मुकुंद केणी आणि मुंब्य्रातील नगरसेवक शानू पठाण यांना विरोधी पक्षनेतेपदाचे कमिटमेंट देऊन बसले आहेत. परंतु, ठाण्यातील नगरसेवकांनी आता थेट अडीच वर्षे हे पद ठाण्याकडे राहावे, यासाठी हट्ट धरल्याने त्यांच्या पुढे या नगरसेवकांनी आव्हान निर्माण केल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीदेखील जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्यातील वाद चर्चेचा विषय झाला होता. आता त्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेतेपदावरून हा वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नजीब मुल्ला यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून पुन्हा जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
अध्यक्ष या नात्याने मी पक्षातील मंडळींना इच्छा व्यक्त करायला सांगितली होती. प्रत्येक पक्षात अशा प्रकारचे वाद होत असतात. लोकशाही पार्टी जिवंत ठेवायची असेल तर असे वाद हे होणारच. परंतु, यावर लवकरच योग्य तो तोडगा काढला जाईल.
- आनंद परांजपे, शहराध्यक्ष, राष्टÑवादी