मेघडंबरीच्या खर्चावरून शिवसेनेत दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:09 AM2020-02-16T01:09:57+5:302020-02-16T01:10:13+5:30
दुरुस्तीसाठी एक कोटी मंजूर । प्रत्यक्षात कामाला सुरुवातच नाही
अंबरनाथ : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा जुना पुतळा नव्या मेघडंबरीत बसविण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या पुतळ्यासाठी जी मेघडंबरी उभारली आहे त्यासाठी एका बिल्डरने खर्च करणे चुकीचे असल्याचा आरोप करत उपनगराध्यक्षांनी त्या संदर्भात पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. मेघडंबरीच्या खर्चावरुन वाद निर्माण होताच त्या संदर्भात आता शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले आहे. महाराजांच्या विषयाला विरोध करण्याची गरज काय असा आरोप आता शिवसेनेतील दुसरा गट करत आहे. महाराजांच्या विषयाला विरोध केल्याने उपनगराध्यक्षांना कोंडीत पकडायला सुरूवात झाली आहे.
या चौकात महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन दगडी मेघडंबरी उभारली आहे. दोन महिन्यांपासून त्याचे कामही सुरू होते. मात्र या मेघडंबरीच्या लोकार्पण सोहळ्याच्या तीन दिवस आधीपासून शिवसेनेत वाद सुरू आहे. उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी पालिका प्रशासनला पत्र देत मेघडंबरीचा खर्च बिल्डरकडून का घेतला असा सवाल केला. तसेच या चौकासाठी पालिकेने ५ लाखांचा निधी मंजूर केला होता तो कुठे गेला अशी विचारणा केली आहे. शेख यांच्या या पत्रामुळे शिवसेनेत दोन गट झाले. दुसऱ्या गटाने उत्तर देण्यास सुरूवात केल्याने हा वाद विकोपाला गेला आहे. समाजमाध्यमावरही चर्चा रंगली आहे. शेख यांच्या विरोधात राजकीय वातावरण पेटविले जात आहे.
मोठे नेते अद्याप शांत
हे काम बिल्डर स्वत: करुन देत असल्याने त्या अनुषंगाने पालिकेने रितसर ठराव केला आहे. त्याला योग्य त्या परवानग्या घेतल्या आहेत. विरोधच करायचा होता तर तो प्रस्ताव मंजुरीच्या वेळेस करणे गरजेचे होते. काम झाल्यावर विरोध करण्याची काहीही गरज नव्हती. या वादावर मोठ्या नेत्याकडून पडदा टाकण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही.