ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:33+5:302021-03-05T04:40:33+5:30
ठाणे : शहरातील श्रीनगर आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. रात्री ...
ठाणे : शहरातील श्रीनगर आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. रात्री फेरफटका मारणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत चालत जाणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोराने पळ काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कासारवडवली आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कासारवडवली येथे राहणारे तुषार मालाडकर (२८) हे रात्री ८ च्या सुमारास फेरफटका मारत असताना पाठीमागून येणाऱ्या एका तरुणाने त्यांना जोरदार धडक देत त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन घेऊन पोबारा केला. याप्रकरणी कासारवडवली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शोध घेतला असता सुरेश गंभीरे (२१, रा. मानपाडा) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कासारवडली पोलीस करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत किसननगरमधील रहिवासी दिलीपराव मोहिते (६२) हे रात्री ९ च्या सुमारास दूध घेऊन चालत घरी जात असताना पाठीमागून आलेल्या अनोळखी चोराने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पोबारा केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
------------------