डहाणूच्या पोलीस निरीक्षकानं दुचाकीस्वाराला उडवलं; तीन चाकांवर १५ किमी पळवली कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 10:52 AM2021-11-06T10:52:42+5:302021-11-06T10:53:01+5:30
वाणगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल
डहाणू: डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष खरमाटे यांनी आपल्या खाजगी गाडीने चिंचणी-तारापूर बायपास जवळ रात्रीच्या सुमारास एका मोटर सायकलस्वाराला जोरदार धडक देऊन पळून गेल्याने या परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस व ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चिंचणी डहाणू येथे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
डहाणू पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष खरमाटे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आपल्या खाजगी स्विफ्ट कारने पालघर येथे जात असताना चिंचणी-तारापूर बायपासच्या पुलाजवळ भरधाव वेगाने एका मोटर सायकल चालकाला धडक दिली. यात अरविंद सावे आणि सुरेखा सावे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रात्रीच्या सुमारास पोलीस व ग्रामस्थांनी स्विफ्ट गाडीच्या पाठलाग केला. अखेर अपघात करून पळालेले वाहन डहाणू पोलीस ठाण्यात आढळून आले. अपघात झाल्यानंतर कारचे पुढील भागातील डावीकडचे चाक निखळले. मात्र तरीही जवळपास १५ किलोमीटरपर्यंत कार तीन चाकांवर धावत होती.
रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, डहाणू-पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कोळी यांनी ग्रामस्थांना शांत केले. सध्या चिंचणीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.