महावितरणच्या वायरिंगच्या आगीत दोघेजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:01+5:302021-07-01T04:27:01+5:30
ठाणे : खोपट एस.टी. स्टँडजवळील नाल्यावरील पदपथावरून जात असताना बाजूला असलेल्या महावितरणच्या मोकळ्या वायरीने अचानक पेट घेतला. यावेळी तेथून ...
ठाणे : खोपट एस.टी. स्टँडजवळील नाल्यावरील पदपथावरून जात असताना बाजूला असलेल्या महावितरणच्या मोकळ्या वायरीने अचानक पेट घेतला. यावेळी तेथून जात असलेले फिर्यादी सुभाषकुमार कनोजीया (वय ३८) आणि त्यांचा मित्र जितेंद्र प्रसाद (३२) यांच्या पायांवर आगीचे लोळ आले. त्यात फिर्यादी यांचे दोन्ही पाय होरपळले असून त्यांच्या मित्राच्याही डाव्या पायाला या आगीचे चटके सहन करावे लागले आहेत. ही घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी महावितरणच्या चुकीमुळेच आपल्याला त्रास झाल्याचे सांगून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत.
---------------------------------------
मोबाईल चोरीला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर भागात जाण्यासाठी कॅडबरी जंक्शन येथे बसमध्ये चढत असताना फिर्यादी यांच्या खिशातील मोबाइल अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
-------------------------------------
मंगळसूत्र चोरणारे दोघे अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रेल्वेस्थानकाच्या परिसरातील बाजारपेठेच्या एका गल्लीतून ७५ वर्षीय महिला जात होती. त्याच वेळेस दोघा व्यक्तींनी त्यांना अडवून आमच्या शेठला मुलगा झाला असल्याने ते गरीब महिलांना साडी वाटत असल्याचे सांगितले. तसेच आमच्या शेठला गळ्यातील काळा दोरा आणि काळा रंग आवडत नसल्याने तुम्ही येथेच बसा, असे सांगून तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून रुमालात ठेवा आणि तो रुमाल आमच्याकडे द्या, असे सांगून मंगळसूत्र काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाश काळे (वय २८), रा. मुंबई आणि त्याच्या आणखी एका सहकाऱ्यास ठाणे नगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
-----------------------------------------
कारमधील म्युझिक सिस्टीमची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर भागातील प्रकृती पार्क येथे उभ्या केलेल्या चारचाकी वाहनाची काच फोडून त्यातील म्युझिक सिस्टीम अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी एकच्या दरम्यान घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करीत आहेत.
----------------------------------------
दुचाकी चोरीला
ठाणे : हरिओम पेपर मार्टजवळ फिर्यादी यांनी पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस तपास करीत आहेत.
-------------------------------------------
एक लाख आठ हजारांची चोरी
ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यशोधननगर भागात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटात असलेले सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.