खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:51 AM2018-05-19T05:51:21+5:302018-05-19T05:51:21+5:30
भिवंडी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याकडे ६५ लाखांची खंडणी मागणाºया दोन पत्रकारांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली.
ठाणे : भिवंडी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याकडे ६५ लाखांची खंडणी मागणा-या दोन पत्रकारांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. आरोपींनी माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून बदनामीची धमकी दिली होती.
भिवंडी पंचायत समितीचे शाखा अभियंता दत्तू गिते यांच्याकडे उपअभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. भिवंडी येथील साप्ताहिक शब्ददूतचा संपादक रंगनाथ हरिभाऊ तांगडी आणि ठाण्यातील साप्ताहिक भाग्यदूतचा संपादक पांडुरंग बाबूराव बेनके यांनी फेब्रुवारी २०१७ पासून माहिती अधिकाराचा वापर करून गिते यांची कार्यालयीन आणि वैयक्तिक माहिती मागवली. माहिती अधिकाराचे अर्ज मागे घेण्यासाठी तांगडी याने ४० लाख, तर बेनके याने २५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यांनी गिते यांच्याविरुद्ध बातम्याही प्रसिद्ध केल्या. दीड लाखांची खंडणी घेऊनही तांगडीने गिते यांच्याकडे पुन्हा ४० लाख रुपयांची मागणी केली. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर पैसे आणण्यास सांगितले.
गिते यांनी ही माहिती खंडणीविरोधी पथकाला दिली. त्यानुसार या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी तांगडेला रंगेहाथ अटक केली. बेनकेचाही यात सहभाग असल्याने त्यालाही अटक केली. दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
>खंडणीखोर व्यावसायिक गजाआड
ठाणे : कळव्यातील दुकानदारांकडून खंडणी उकळणाºया व्यावसायिकास खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. या दुकानांच्या वाढीव बांधकामाची तक्रार आरोपीने महापालिकेकडे केली होती. कळवा येथील नारायण लोकय्या सुवर्णा हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे कळवा येथे श्रद्धाज किचन नावाचे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलच्या रांगेत आणखी काही दुकाने आहेत. या दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर वाढीव शेडचे बांधकाम केले आहे. त्याविरोधात कॅटरिंगचा व्यवसाय करणारा कळव्यातील सुनील बबन साळुंके याने तक्रार केली होती. ती मागे घेण्यासाठी त्याने दुकानदारांकडे १० लाखांची खंडणी मागितली होती.