मोटारसायकल चोरीसह पोलिसांवरही हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघे अल्पवयीन आंबिवलीतून जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 07:16 PM2021-03-30T19:16:15+5:302021-03-30T19:18:51+5:30

मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोडया, वाहन चोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली आहे.

Two juveniles arrested in Ambivali gang involved in motorcycle theft | मोटारसायकल चोरीसह पोलिसांवरही हल्ला करणाऱ्या टोळीतील दोघे अल्पवयीन आंबिवलीतून जेरबंद

एकाच रात्रीत भिवंडी, कळवा आणि नौपाडयातही चोरी

Next
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईएकाच रात्रीत भिवंडी, कळवा आणि नौपाडयातही चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोडया, वाहन चोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील सात मोटारसायकली आणि चार मोबाईल असा पाच लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोटारसायकलींची चोरी केल्यानंतर त्यांचा वापर महिलांच्या गळयातील सोनसाखळीची जबरीने चोरी करण्यासाठी केला जाणार असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीतील शांतीनगर, माणकोली त्यापाठोपाठ ठाणे शहरातील कळवा, नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ जणांच्या एका टोळीने एकाच दिवशी मोटारसायकली चोरी करून एका पोलीस बिट मार्शलवर हल्ला झाल्याची घटना २१ मार्च रोजी घडली होती. हा तपास सुरु असतांना या टोळीतील दोघे जण आंबिवलीच्या इराणीवाडीत दडून बसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे, अंमलदार आनंदा भिलारे, रवींद्र पाटील , रिझवार सय्यद, विक्रांत कांबळे आणि तेजश्री शेळके आदींच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडीत २७ मार्च रोजी छापा टाकून दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर मोटारसायकली इराणी वाडी येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीस पथकाने चोरीच्या सात मोटारसायकली त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता, आठ जणांची टोळी यामध्ये असून या टोळीने एकाच दिवशी आठ मोटारसायकली चोरी केल्याची बाब समोर आली. त्यापैकी एक मोटारसायकल भिवंडी येथे एका पोलिसाच्या अंगावर चढविण्याच्या प्रयत्नात घसरल्यामुळे ती तिथेच टाकून या दोघांनी इतर साथीदारांच्या मोटारसायकवरून पळ काढला होता. भिवंडी, ठाणे आणि मुलुंड परिसरातुन या मोटरसायकली चोरी केल्याची कबुलीही त्यांनी दिली. या मोटारसायकली इराणी वाडीतील सराईत सोनसाखळी चोरांना चोरी करण्यासाठी विकणार होते अशी धक्कादायक माहिती दोघांच्या चौकशीतून समोर आली आहे. गुन्हे शाखेने या दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Two juveniles arrested in Ambivali gang involved in motorcycle theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.