ठाण्यात स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; दहा वर्षीय मुलगा जखमी, ७३ खोल्या केल्या रिकाम्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:37 AM2021-09-13T05:37:06+5:302021-09-13T05:39:52+5:30
या घटनेत दहा वर्षांचा मुलाचा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील राबोडी येथील एका चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून रमील शेख (३२) आणि हनिफ गौस (४०) या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दहा वर्षांचा मुलाचा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
राबोडीतील सुमारे २५ वर्षे जुनी असलेली खत्री अपार्टमेंटची इमारत ठाणे महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरचा स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला. त्यामुळे तळमजल्यावरील रहिवासी स्लॅबखाली दबले गेले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना गंभीर जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच रमीज आणि हनिफ यांचा मृत्यू झाला.
हनिफ यांचा दहा वर्षीय मुलगा फरहान महमंद गौस तांबोळी याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले असून, त्याच्यावर संजीवन या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या ए, बी आणि सी विंगमधील ७३ खोल्या पूर्णपणे रिकाम्या केल्या आहेत. येथील ७३ कुटुंबीयांना जवळच्या खांदेशी मस्जिदमध्ये स्थलांतरित केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.