डम्परच्या धडकेत दोन मजूर ठार; सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:31 PM2019-12-17T23:31:53+5:302019-12-17T23:31:55+5:30
हे सर्व मजूर सायंकाळी चहा पिण्यासाठी चमन हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर बसलेले होते.
भिवंडी : महापालिकेच्या रामनगर चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकून परतणाऱ्या डंपरचे ब्रेक चमन हॉटेलसमोर फेल झाल्याने झालेल्या अपघातात मंगळवारी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. शब्बीर उर्फ राजू खान (४०) व अहमद हारून मोमीन (३२) अशी मृतांची नावे आहेत, तर समीन खान (४५) , रामकुमार मौर्य (४०),साजिद अली (२७), जमाल शेख (२७), मझहर खान (५६) गुफरान अंसारी (२४) अशी अपघातात जखमी झालेल्या मजूरांची नांवे आहेत.
हे सर्व मजूर सायंकाळी चहा पिण्यासाठी चमन हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर बसलेले होते. त्यावेळी महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा डंपर क्र .एमएच - ०४ - डीडी -८४४३ हा डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकून उतारावरून परतत असताना डंपरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर थेट हॉटेलच्या भिंतीवर जाऊन आदळला. यावेळी बाकड्यावर बसलेले दोन मजूर जागीच ठार झाले. यातील जखमींपैकी जमाल शेख व मझहर खान या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
समीन, साजिद व रामकुमार या तिघांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे तर गुफरान याच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार करून त्यास घरी सोडण्यात आले आहे. या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून रात्री उशिरा डंपर चालकाच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईची मागणी
च्अधिकारी, ठेकेदाराच्या संगनमताने कचरा वाहतुकीसाठी मुदतबाह्य वाहने वापरली जातात. बहुतांश वाहनांचे पासिंग झालेले नसते. काही चालकांकडे ड्रायव्हींग लायसन्स नाही. अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे अनंता पाटील यांनी केली.