दोन लाख ६८ हजार नागरिकांना मिळाले दोन्ही डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:05+5:302021-09-16T04:51:05+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेला राज्य सरकारकडून पुरेसे कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने अनेकदा लसीकरण बंद ठेवावे लागते. ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेला राज्य सरकारकडून पुरेसे कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने अनेकदा लसीकरण बंद ठेवावे लागते. मात्र, तरीही महापालिकेच्या हद्दीत दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या दोन लाख ६८ हजार १९४ वर पोहोचली आहे. महापालिकेचे १३ लाख ५९ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, महापालिकेच्या केंद्रांवर लस मिळत नसल्याने खासगी रुग्णालयातून सशुल्क लस घेण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे.
महापालिकेच्या हद्दीतील सहा लाख ४३ हजार ४४७ जणांना लसीचा पहिला डोस, तर दोन लाख ६८ हजार १९४ नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. आतापर्यंत महापालिकेच्या हद्दीत नऊ लाख ११ हजार ६४१ इतके लसीकरण झाले आहे. त्यात सरकारी लसीकरण केंद्रावरून दोन्ही डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या ५ लाख ९५ हजार, तर खासगी रुग्णालयातून एकूण संख्या दोन लाख १० हजार आहे. कामाच्या ठिकाणी पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या ३९ हजार ६६८ आहे.
दुसरीकडे २० हजार ४७२ हेल्थ वर्कर्सना पहिला, तर १३ हजार २१९ जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. २० हजार ७८९ फ्रंटलाईन वर्कर्सना पहिला, तर १४ हजार ९१८ जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. १८ ते ४५ वयोगटांतील तीन लाख १३ हजार जणांना पहिला आणि ५७ हजार २१६ जणांना दुसरा डोस दिला गेला आहे. ४५ ते ६० वयोगटातील एक लाख ७३ हजार जणांना पहिला, तर एक लाख दोन हजार जणांना दुसरा डोस दिला आहे. ६० पेक्षा अधिक वय असलेल्या एक लाख १५ हजार १५ जणांना पहिला, तर ८० हजार जणांना दुसरा डोस दिला गेला आहे.
रोज दोन हजार नागरिकांची चाचणी
- सध्या केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वर्षी गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढले होते. आता रोज दोन हजारांहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे.
- तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. प्रत्यक्षात पुरेसे डोस अजूनही उपलब्ध होत नाही. दुसरीकडे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे तिसरी लाटेत रुग्णसंख्या एकदम वाढेल, याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांना धूसर वाटत आहे.
---------