ठाणे-पालघरमध्ये दोन लाख बोगस विद्यार्थी? मुख्याध्यापक, संचालक रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:04 AM2018-07-31T03:04:04+5:302018-07-31T03:04:13+5:30
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पाच नगरपालिका, सात महापालिका आणि १८ तालुक्यांतील ७५ प्राथमिक शाळांचा पटसंख्या खोटी दाखवून शासन सवलती मिळवण्यात समावेश असून माध्यमिक शाळांचा विचार करता कारवाईस पात्र शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पाच नगरपालिका, सात महापालिका आणि १८ तालुक्यांतील ७५ प्राथमिक शाळांचा पटसंख्या खोटी दाखवून शासन सवलती मिळवण्यात समावेश असून माध्यमिक शाळांचा विचार करता कारवाईस पात्र शाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांत माध्यमिक व प्राथमिक मिळून दोन लाख विद्यार्थ्यांची पटसंख्या बोगस असल्याचा अंदाज आहे.
पटसंख्या फुगवून सवलती मिळवलेल्या व मिळवण्याच्या तयारीतील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शाळेचे मुख्याध्यापक, संचालक आणि शिक्षकांवर फौजदारी कारवाईसाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरू केली असल्याचे वृत्त लोकमतने यापूर्वीच प्रसिद्ध केले आहे. आता पुन्हा शाळांची तपासणी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
लोकमतच्या वृत्तानंतर शिक्षण विभागाने आता कंबर कसून युद्धपातळीवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शाळांच्या संचालकांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य संबंधित कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता शासनाचे पत्र आले आहे. त्यावर कारवाई करण्यापूर्वी आधीच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून संबंधित शाळांवर कारवाईचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना देणार असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक मुक्तेश्वर छडीदार यांनी लोकमतला सांगितले.
कारवाईसाठी चार निकष
या कारवाईसाठी शासनाने सुमारे चार निकष दिले आहेत. त्यात मोडणाºया शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना तसे आदेश दिले जातील. शाळेत जाऊन तत्कालीन दस्तऐवज व दिलेल्या निकषांची तपासणी होऊन कारवाई होईल.
प्राथमिक शाळेच्या सुमारे ७५ शाळांचा खोटी पटसंख्या नोंदवलेल्यांमध्ये समावेश आहे. यातील सुमारे ४५ शाळांना काही वर्षांपूर्वी नोटीसही बजावलेली आहेत. मात्र, पुन्हा फौजदारी कारवाईसाठी या शाळांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश असल्याचे छडीदार यांनी सांगितले. यातील बहुतांश मुख्याध्यापकांचे निधन झाले असावे ,अशी शंका शैक्षणिक वर्तुळात व्यक्त होत आहे. यावरून खोटी विद्यार्थी पटसंख्या नोंदणाºयांवर आता काय कारवाई होईल, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.
२० लाख विद्यार्थ्यांची केली होती तपासणी
सात वर्षांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात एक हजार ५५५ अधिकाºयांच्या ३० पथकांनी शाळांची विद्यार्थी पटपडताळणी केली आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांमधील सुमारे २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची पटसंख्येची पडताळणी झाली आहे. यामध्ये प्राथमिक शाळा पाच हजार ७१८ शाळा आहेत. यातील तीन हजार ५७९ शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत.
उर्वरित एक हजार ५८२ शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि आश्रमशाळा आहेत. या शाळांमधील ५७६ शाळा अनुदानित आहेत. उर्वरित शाळा विनाअनुदानित व कायम विनानुदानित आहेत. या सर्व शाळांमधील २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळण्यात आली.