संपाचा दोन लाख कुटुंबांना फटका; रेशनकार्डशी आधारकार्ड लिंक करण्याची यंत्रे जमा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:55 AM2018-04-19T01:55:58+5:302018-04-19T01:55:58+5:30
रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे.
ठाणे : शिधापत्रिका आधारकार्डांशी संलग्न करण्याच्या सरकारच्या निर्णयाची पूर्णत: अंमलबजावणी झालेली नसल्याने अनेकांना रेशन मिळणे बंद झाल्याचा रोष रेशन दुकानदारांवर निघू लागल्याने या निर्णयाविरोधात रेशन दुकानदारांनी बंद पुकारला आहे.
ठाणे, कळवा-मुंब्रा, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील सुमारे दीड हजार दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याचा फटका एक लाख ९१ हजार शिधापत्रिकाधारकांना बसला आहे. यामध्ये केशरी कार्डधारकांची संख्या लक्षणीय म्हणजे ८० हजारांच्या घरात आहे.
दुकाने बेमुदत बंद करण्याचा व गुरुवारी दुपारी १२ वाजता मुख्य रेशनिंग कार्यालयात रेशनकार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याचे यंत्र जमा करण्याचा निर्णय रेशनिंग दुकानदारांनी घेतला आहे.
शिधावाटपाची प्रक्रि या बायोमेट्रीक करण्यात आली. नागरिकांची शिधापत्रिका ही आधारकार्डांशी संलग्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रेशनव्यवस्थेमधील भ्रष्टाचार दूर करण्याकरिता सरकारने हे निर्णय घेतले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या अंगठ्यांचे ठसे या बायोमेट्रीक प्रणालीमध्ये वार्धक्यामुळे जुळत नसल्याने गोरगरिबांना धान्य देण्यात अडचणी येत आहेत. दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांकडून कागदपत्रे घेऊन ती शासनदरबारी जमा केल्यानंतरही चुकीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
चुकीचा डाटा जमा केल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच, या बायोमेट्रीक पद्धतीमुळे कुटुंबातील अनेक सदस्यांना धान्य घेण्यासाठी दुकानात जावे लागत आहे. गेली पाच वर्षे आधार संलग्नतेची प्रक्रि या सुुरू असूनही त्यामध्ये सुधारणा न झाल्यानेच हा बंद पुकारण्यात आला असल्याचे ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार कृती समितीने सांगितले.
या बंदमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर आदी भागांतील सुमारे १४७३ दुकानदार सहभागी झाले आहेत, असेही समितीने स्पष्ट केले आहे. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रक्रि या सुधारण्यासाठी दोन बैठका घेण्यात आल्या. मात्र, तोडगा न निघाल्याने आंदोलन केल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.
दरम्यान, बुधवारी राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील तसेच रेशनिंग दुकानदार उपस्थित होते. या बैठकीत शासनाला जाग येण्यासाठी गुरुवारी दुपारी १२ वाजता रेशनकार्ड आधारकार्डासोबत लिंक करण्याच्या मशीन मुख्य रेशनिंग कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत या मशीनमधील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत बंद कायम राहील, असा इशारा दिला जाईल.
बंदच्या काळात धान्य नाही
या बंदचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसणार
असून जवळपास एक लाख ९१ हजार कुटुंबांना
बंदच्या काळात धान्य मिळणार नाही. ठाणे जिल्ह्यातील पिवळ्या रेशनकार्डधारक बीपीएल आणि अंत्योदय अशा दोन योजनांच्या शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे.
बीपीएलअंतर्गत ५६ हजार ४९३, तर अंत्योदय योजनेंतर्गत ४७ हजार ५१ रेशनकार्डधारक येतात. केशरी रेशनकार्ड असलेले ८० हजार ४९०, तर शुभ्र रेशनकार्ड असलेले सात हजार ८२ रेशनकार्डधारक आहेत.
मेस्मा, मकोका लावण्याच्या धमक्या
रेशनिंग दुकानदारांचा बंद मोडीत काढण्यासाठी समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर ‘मेस्मां’तर्गत कारवाई करण्याच्या तसेच ‘मकोका’ लावण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याकडे समितीने लक्ष वेधले.
कळव्यात दोन दुकाने फोडली
रेशनिंगवर धान्य मिळत नसल्याने आणि आधारकार्ड रेशनिंग कार्डशी लिंक करण्याची मागणी होत असल्याने ते जुळले जात नसल्याने अनेकांना धान्य मिळेनासे झाले आहे. याच रोषातून मंगळवारी दुपारी आणि सायंकाळी कळव्यातील दोन दुकाने फोडण्यात आली. एका ठिकाणी तर आधारकार्ड लिंकच्या मशीनची नासधूस करण्यात आली.