कल्याण-डोंबिवलीत उभी राहिली दोन लाख बेकायदा बांधकामे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:23 AM2020-09-10T00:23:21+5:302020-09-10T00:23:37+5:30
उद्यानाच्या आरक्षणावर बांधकाम
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्र, २७ गावे आदी ठिकाणी दोन लाखांहून अधिक बेकायदा बांधकामे झाली असून, त्यावर कोणीही कारवाई करत नाही. मनपा प्रशासन असो की सत्ताधारी, विरोधी पक्ष सगळे याला जबाबदार आहेत. ते सगळे एका माळेचे मणी असल्याची टीका माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी केली.
बेकायदा बांधकामांबाबत सातत्याने आवाज उठवूनही कारवार्ई होत नाही. या शहरांमधील ९० टक्के बांधकामे ही आराखड्यानुसार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. या संदर्भात वर्षानुवर्षे लढा सुरू आहे. आताही नुकतेच क्रीडासंकुलाजवळील बेकायदा गाळे बांधल्यासंदर्भात गोखले यांनी मनपाला पत्र दिले होते. त्यावर पालिकेने कारवाई केल्याचे खोटे सांगितल्याची टीकाही गोखले यांनी केली.
ते म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली, त्यांचीही चौकशी करावी, याबाबत पाठपुरावा सुरू आहे. ज्या एका प्रकरणात मनपाचे अधिकारी निलंबित झाले होते, तेथेही चार मजले जादा चढवले गेले आहेत.डोंबिवली पश्चिमेत उद्यानाच्या आरक्षणावर उभारलेल्या इमारतीवर तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके असताना हातोडा पडला होता, पण आता तेथे सगळे आलबेल आहे. इमारत डागडुजी करून वापरात आणली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
केडीएमसीत आयएएस दर्जाचे आयुक्त आणून फायदा काय झाला? बेकायदा बांधकामे वाढतच असून, त्याला आळा बसला का, असा सवाल त्यांनी केला. २७ गावांसंदर्भात ते म्हणाले की, राजरोसपणे बेकायदा बांधकामे सुरू असून त्याकडे कोणाचे लक्ष नाही.
वेळोवेळी जाहीर होणाºया बेकायदा बांधकामांपैकी किती बांधकामांवर कारवाई झाली, याचे काहीही उत्तर नाही? त्याला जबाबदार कोण? जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले.
बेकायदा बांधकामांचा पैसा नेमका जातो कुठे? त्याची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत, याची सखोल चौकशी करावी, आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण द्यावे, यासाठीही ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे गोखले म्हणाले. काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.