विदेशीच्या चलनाच्या बदल्यात भारतीय चलन पाहिजे असल्याची बतावणी करुन दोन लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:31 AM2020-10-09T01:31:08+5:302020-10-09T01:33:55+5:30
अमेरिकन डॉलर्सच्या बदल्यामध्ये भारतीय चलनाच्या नोटा हव्या असल्याची बतावणी करीत एका ४१ वर्षीय व्यक्तीला त्रिकुटाने दोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शीळफाटा भागात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मृत महिलेच्या सामानामध्ये अमेरिकन डॉलर्स मिळाले असून ते बदलून भारतीय चलनाच्या नोटा हव्या असल्याची बतावणी करीत एका ४१ वर्षीय व्यक्तीला त्रिकुटाने दोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शीळफाटा भागात घडली. या प्रकरणी बुधवारी डायघर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील वाशी सेक्टर १८ येथे राहणारे श्रीनाथ अयोध्या सोनाथ यांच्या ओळखीच्या राजू नामक मित्राने त्याच्या मावशीला मृत पावलेल्या महिलेचे समान मिळाले असून त्यातील गादीमध्ये अमेरिकन डॉलर्स सापडले आहेत. त्या डॉलर्सच्या बदल्यात भारतीय चलनाच्या नोटा हव्या असल्याची बतावणी केली. तसेच विदेशी चलनाचे आमिष दाखवून राजूचा मित्र आणि त्याची मावशी यांनी सोनाथ यांना रोख रक्कम घेऊन कल्याणफाटा डायघर येथे बोलविले. यावेळी सोनाथ यांच्याकडून आरोपींनी भारतीय चलनाच्या दोन लाखांच्या नोटा घेऊन सोनाथ यांच्या हातात वर्तमानपत्राचे बंडल बंदल असलेली कापडी पिशवी दिली. त्यानंतर तिथून पलायन केल्याची घटना ४ सप्टेंबर २०२० रोजी घडली. काही काळाने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर श्रीनाथ यांनी डायघर पोलीस ठाण्यात राजू आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्याविरुद्ध ७ आॅक्टोंबर २०२० रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.