दोन लाख करदात्यांनी मालमत्ताकर भरलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 03:07 AM2018-11-14T03:07:18+5:302018-11-14T03:07:34+5:30
आयुक्तांनी घेतला आढावा : डिसेंबरअखेरपर्यंत ५०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट
ठाणे : मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात आढावा बैठकीत दिले. शहरातील सुमारे दोन लाखाहून अधिक मालमत्ताधारकांकडून कर वसुलीसाठी प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या आढावा बैठकीत बोलताना आयुक्तांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतानाच डिसेंबर अखेर वसुली उद्दीष्टाच्या ८४ टक्के म्हणजेच जवळपास ५०० कोटी रुपये करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे सक्त निर्देश दिले. अस्तित्वातील मालमत्तांची वसुली करण्याबरोबरच नवीन मालमत्तांची करआकारणी २५ डिसेंबरपर्यंत करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्त्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही २५ डिसेंबर अखेर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पाणीपट्टी वसुलीबाबत बोलताना आयुक्तांनी प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच कार्यकारी अभियंता यांनी एकित्रतपणे डिसेंबर अखेर ८० टक्के वसुली करण्याच्या सूचना दिल्या.
थकबाकीदारांच्या वसुलीस प्राधान्य
मंगळवार अखेर अंदाजे ३०२ कोटी मालमत्ताकराची वसुली झाली आहे. ती ही निर्धारित उद्दीष्टाच्या ५० टक्केपेक्षा जास्त झाली आहे. जवळपास ४.७५ लक्ष मालमत्ताकराची देयके वितरित केली असून त्यापैकी जवळपास २.६६ लक्ष ग्राहकांनी आपला कर भरला आहे.
उर्वरीत २.०९ लक्ष लोकांनी आपला मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
त्याचप्रमाणे ब्लॉकनिहाय पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राध्यान्य देण्याच्या सूचना देतानाच पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्यासही सांगितले.