दोन लाख १२ हजार रोपांची लागवड

By admin | Published: July 2, 2017 05:59 AM2017-07-02T05:59:10+5:302017-07-02T05:59:10+5:30

राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख १२ हजार

Two lakhs 12 thousand seedlings planted | दोन लाख १२ हजार रोपांची लागवड

दोन लाख १२ हजार रोपांची लागवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २ लाख १२ हजार इतकी रोपे लावण्यात आली आहेत. वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर सर्व शासकीय विभागांनी मिळून केलेले हे वृक्षारोपण आहे, अशी माहिती उपमुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.
जिल्ह्यातील मुख्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर, आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला. तर, मुंब्रा बायपास रोडवरील खारिवलीदेवी मंदिराच्या पायथ्याशी कदंब वृक्षाचे रोपटे लावून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात या योजनेचा शुभारंभ केला. या वेळी आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरात यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी दिनानिमित्त शनिवारी गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांच्या हस्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी २०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. प्रसंगी कारागृह अधीक्षक नितीन वायचळ उपस्थित होते. तसेच, सिंह यांनी कारागृहातील कारखाना, बेकरी, शिवणकाम, महिला विभाग आदी विभागांना भेट देऊन कारागृहाची पाहणी केली.
५० हजार झाडे लावणार
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत महापालिका या मोहिमेंतर्गत आठवडाभरात ५० हजार वृक्षांची लागवड करणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ वृक्षदिंडी काढून करण्यात आला. या वेळी सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.
वृक्षदिंडीला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नारळ फोडून दिंडीचा शुभारंभ केला. रोटरी क्लब, औद्योगिक विभाग, टिळकनगर विद्यालय, धडपड व्यासपीठ व कल्याण-डोंबिवली महापालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्यातर्फे ही दिंडी काढण्यात आली. त्यात वृक्षप्रेमी नागरिक व डोंबिवली विभागातील २५ शाळांनी सहभाग घेतला होता. दिंडीचा समारोप एमआयडीसीतील ज्ञानमंदिर शाळेजवळ झाला.
कसाऱ्यात वृक्षदिंडी
कसारा : कसाऱ्यातील शेठ बा.ह. अग्रवाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा तायडे- हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
नारायणगावात उपक्रम
शेणवा : मळेगाव ग्रुपग्रामपंचायतीच्या वतीने नारायणगावात वृक्षलागवड करण्यात आली, या वेळी सरपंच दीक्षा पडवळ, उपसरपंच अमृता वरकुटे, सदस्य वैभव पडवळ, विलास वरकुटे, ग्रामसेवक एच. खाडे, शिपाई कैलास शिर्के, सोमनाथ शिर्के यांच्यासह गावकरी उपस्थित होते. येथील संघर्ष पत्रकार सेवाभावी संघाच्या वतीने वेलोशी येथे वृक्षलागवड करण्यात आली.
४४ हजार झाडांचे लक्ष्य
अनगाव : भिवंडी तालुका व पडघा वन विभागाच्या वतीने शनिवारी १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. तालुक्यात १२० ग्रामपंचायतींत ४४ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी हनुमंत दोडके यांनी दिली.
मानवेल बांबूंची लागवड
शहापूर : शहापूर वन विभागामार्फत वनप्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते मानवेल जातीच्या बांबूंची लागवड करून वृक्षारोपण सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी आमदार दौलत दरोडा, तहसीलदार रवींद्र बावीस्कर, पोलीस उपअधीक्षक विशाल ठाकूर, भाजपाचे अशोक इरनक, काशिनाथ भाकरे, शहापूरचे उपवनसंरक्षक डी.पी. निकम, वनप्रशिक्षण संस्थेचे संचालक चंद्रकांत भारमल, सहायक उपवनसंरक्षक एस.पी. चव्हाण, वनक्षेत्रपाल एन. जी. कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

लग्नाआधी वृक्षारोपण : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे पुतणे संग्राम तावडे आणि नववधू प्राजक्ता जोशी यांनी मात्र लग्नाचे सात फेरे घेण्याआधी वृक्षारोपण करून नवीन पिढीला अनोखा संदेश दिला. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संग्राम तावडे आणि त्यांची पत्नी प्राजक्ता जोशी यांनी लग्नाच्याच हॉलमध्ये सकाळी लवकर येऊन वृक्षारोपण केले.

Web Title: Two lakhs 12 thousand seedlings planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.