उत्तरप्रदेशातून पळालेल्या दोन अल्पवयीन मुली मिळाल्या ठाणे रेल्वे स्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:55 AM2021-08-13T00:55:04+5:302021-08-13T00:57:57+5:30

उत्तरप्रदेशातील घरातून पळून आलेल्या १४ आणि १७ वर्षीय दोन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना यश आले. रेल्वे पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल दोन्ही मुलींच्या पालकांनी तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

Two minor girls who escaped from Uttar Pradesh were found at Thane railway station | उत्तरप्रदेशातून पळालेल्या दोन अल्पवयीन मुली मिळाल्या ठाणे रेल्वे स्थानकात

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीन

Next
ठळक मुद्दे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीनकुटूंबावरील रागातून सोडले घर

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उत्तरप्रदेशातील घरातून पळून आलेल्या १४ आणि १७ वर्षीय दोन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना यश आले. ठाण्यातील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल बाजूकडील पादचारी (एफओबी ) पूलावर संशयास्पदरित्या फिरतांना त्या गरुवारी पहाटेच्या सुमारास आढळल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक नविन सिंह, उपनिरीक्षक सोनालीर मलैया आणि जमादार हंसवती भालावी हे गुरुवारी ठाण्यातील सीएसटीच्या दिशेकडील पादचारी पूलावरुन १२ आॅगस्ट रोजी २ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्याच वेळी या पुलावर त्यांना ही १४ वर्षीय मुलगी संशयास्पदरित्या आढळली. चौकशीत तिने या पथकाला कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच तिच्याकडे प्रवासाचे तिकीटही नव्हते. तिला विश्वासात घेत ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात आणून पुन्हा तिची चौकशी केली. तिने शालीनी वर्मा (१४, रा. चौराचोरी, गोरखपूर, उत्तरप्रदेश, नावात बदल आहे.) अशी ओळख सांगितली. तिची माहिती गोरखपूर येथील कुटूंबीयांना सिंग यांच्या पथकाने दिली. ती कुशीनगर येथून गोरखपूर लोकमान्य टिळक या रेल्वेने मुंबईकडे आल्याचेही तिने कबूल केले. तिच्या कुटूंबीयांशी संपर्क केल्यानंतर तिच्या अपहरणाबाबत चोराचौरी पोलीस ठाण्यात गोरखपूर येथे तक्रार दाखल केल्याचीही बाब तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबईतील मुलूंड येथील तिच्या आत्याकडे ओळख पटवून या पथकाने तिला सुपूर्द केले. व्हिडिओ कॉलिंगद्वारे तिच्या वडिलांनी तिच्याशी संवादही साधला. हे कुटूंब पूर्वी ठाण्यात वास्तव्याला होते. त्यामुळे वडिलांशी कौटूंबिक कारणावरुन रागावल्याने तिने ठाण्यात पळून येण्याचा निर्णय घेतला होता.
*दरम्यान, याच रेल्वेने आलेली अन्यही एक १७ वर्षीय मुलगी याच पथकाला फलाट क्रमांक दोनवर संशयास्पदरित्या गुरुवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. वडिलांचा शिक्षणाला विरोध असल्याने आपण पळून आल्याचा दावा तिने चौकशीदरम्यान केला. तिलाही तिच्या ऐरोली येथील चुलत भावाकडे ओळख पटवून या पथकाने सुपूर्द केले. रेल्वे पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल दोन्ही मुलींच्या पालकांनी तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Two minor girls who escaped from Uttar Pradesh were found at Thane railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.