ठाणे शहरातून दहा दिवसांमध्ये दोघे बेपत्ता: गूढ वाढले
By जितेंद्र कालेकर | Published: April 21, 2021 11:41 PM2021-04-21T23:41:23+5:302021-04-21T23:43:50+5:30
ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहरातील वेगवेगळया भागातून प्रदिप पांडूरंग पालकर (५५) आणि रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हे दोघे गेल्या दहा दिवसांमध्ये बेपत्ता झाले आहेत. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांच्या कुटूंबीयांनी तक्रार दाखल केली असून या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खोपट, सिंगनगर भागातील रहिवाशी प्रदिप हे ९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सिंगनगर चाळ क्रमांक पाच येथील आपल्या घरातून निघून गेले. घरातून बाहेर पडतांना त्यांनी कोणालाही काहीही माहिती दिली नाही. दोन दिवस उलटूनही ते घरी न परतल्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार पालकर कुटूंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी केली. अर्थात २० एप्रिलपर्यंतही त्यांचा शोध लागू शकलेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पालकर यांच्यापाठोपाठ नौपाडा भागातील अन्य एक रहिवाशी रोशन बनारसी बेनबन्सी (२३) हा तरुणही १२ एप्रिल २०२१ पासून दुपारी १२ वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. तो नौपाडयातील विवाह नोंदणी कार्यालय येथे त्याच्या पालकांना १२ एप्रिल रोजी दिसला होता. त्यावेळी ते त्याला भेटण्यासाठी गेले. मात्र, तेंव्हापासून तो बेपत्ता झाल्याचे रोशनचे वडिल बनारसी यांनी पोलिसांना सांगितले. रोशन याचाही शोेध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.
*हिरेन प्रकरणामुळे बेपत्ता व्यक्तींबाबत अधिक सतर्कता
मनसुख हिरेन बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे आढळले. हिरेन प्रकरणामुळे आता कोणीही बेपत्ता झाले तरी पोलीस अधिक सतर्क होऊन बारकाव्याने तपास करीत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.
* अशी आहेत कारणे-
लॉकडाऊनमुळे घरात आर्थिक अडचण, कुटूंबात होणारे वाद, पती पत्नींमधील कलह, कामधंदा नसणे, कर्जबाजारीपणा किंवा प्रेमप्रकरण अशा अनेक कारणांमुळे घरातून कोणालाही काही न सांगता बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती एका पोलीस अधिकाºयाने दिली. अनेकदा घरगुती कारणातून किंवा तणावातूनही बेपत्ता झालेल्या व्यक्ती कालांतराने मिळतात. परंतू, त्या मिळेपर्यंत कुटूंबातील इतर व्यक्ती तणावाखाली असतात, असेही या अधिकाºयाने सांगितले.