भिवंडीचे दोन मोबाईल चोर ठाण्यात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 08:31 PM2018-06-11T20:31:10+5:302018-06-11T20:31:10+5:30
बेसावध लोकांचे मोबाईल फोन चोरून मोटारसायकलवर फरार होणाऱ्या भिवंडीच्या दोन चोरांना चितळसर पोलिसांनी गजाआड केले.
ठाणे : मोटारसायकलवर फरार होण्याच्या बेतात असलेल्या दोन मोबाईल चोरांना चितळसर पोलिसांनी शुक्रवारी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
चितळसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल घुगे आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रविण बनगोसावी यांचे पथक शुक्रवारी गस्त घालत असताना विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवर दोन युवक कापूरबावडी नाक्याकडून घोडबंदर रोडकडे जाताना दिसले. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून तत्त्वज्ञान सिग्नलच्या सर्व्हिस रोडवरील पेट्रोल पंपाजवळ त्यांना अडवले. त्यांच्याजवळ मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यांची कसून चौकशी केली असता दोन्ही युवक मोबाईल चोर असल्याची माहिती उघडकीस आली.
आमिर उर्फ अरबाज अस्लम खान आणि रिजवान उर्फ बाबू निजामोद्दीन अन्सारी ही आरोपींची नावे असून, दोघेही भिवंडीचे रहिवासी आहेत. घोडबंदर रोडवरील आनंदनगर चेकनाका ते कासारवडवली परिसरात त्यांनी मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे केल्याची माहिती चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चोरीचे काही मोबाईल फोन आरोपींच्या घरझडतीतून मिळाले. काही मोबाईल फोन त्यांनी दुकानदार तसेच नागरिकांनाही विकले होते. आरोपींकडून चोरीचे २५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, ते आणखी कोणत्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे गणपतराव पिंगळे यांनी सांगितले. बेसावध असलेल्या नागरिकांचे मोबाईल फोन चोरण्याचे अनेक गुन्हे आरोपींनी घोडबंदर रोडवर केले आहेत. आरोपींकडून हस्तगत केलेले २५ मोबाईल फोन घोडबंदर रोडवरील रहिवाशांचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाचा मोबाईल फोन चोरी गेला असल्यास त्यांनी आयएमइआय क्रमांक घेऊन चितळसर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.