लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, उल्हासनगरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 12:09 PM2023-06-15T12:09:00+5:302023-06-15T12:09:24+5:30
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: कॅम्प नंबर ३ मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण लवकरच उघड होईल, अशी माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर ३, मीनाताई ठाकरे नगर येथील काजल कुंदन सावंत ही भक्ती या दाेन महिन्यांच्या मुलीला घेऊन नियमित लसीकरणासाठी मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता आली होती. लसीकरण झाल्यानंतर, ताप आल्यास तापाच्या गोळ्या कशा घ्यायच्या याबाबतची माहिती आशा वर्करने तिला दिली. हसत्या खेळत्या भक्तीला घरी गेल्यावर तापाची गोळी दिली आणि तिची तब्येत बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
बुधवारी सकाळी भक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मात्र, डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास न ठेवता नातेवाईकांनी मुलीला खासगी रुग्णालयात नेले. तेथेही मुलीला मृत घोषित केल्यावर पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली आहे.
ओठ काळे पडले, दातखीळ बसली
- मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या आदेशानुसार संबंधित डॉक्टरांनी झालेल्या प्रकाराची माहिती मध्यवर्ती पोलिस ठाण्याला दिली.
- मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
- पोलिस पंचनाम्यात मुलीचे ओठ काळे पडले असून, मुलीची दातखीळ बसल्याचे नमूद केले आहे. तसेच दोन्ही पायांना इंजेक्शन दिल्याच्या खुणा आहेत, मात्र मारहाणीच्या खुणा नसल्याचे समोर आले आहे.
लसीकरण झालेली इतर मुले ठणठणीत
- महापालिकेच्या मोहटा देवी येथील आरोग्य केंद्रात मृत भक्ती कुंदन सावंत या मुलीसह इतर मुलांचेही लसीकरण झाले.
- मात्र, बाकीच्या मुलांची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी अनिता सपकाळे यांनी दिली.
- लसीकरणानंतर रात्री मुलीच्या तब्येतीमधील घटनाक्रम समजल्यास मुलीच्या मृत्यूचे ठोस कारण सांगता येईल, असेही त्यांनी सांगितले.