दोन महिन्यांत ३६ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:11 AM2019-03-16T00:11:59+5:302019-03-16T00:12:10+5:30
३७ लाखांचा ऐवज चोरीला; पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत १ जानेवारी ते १३ मार्चपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी ३६ ठिकाणी घरफोड्या करत ३७ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरला. घरफोडीच्या सर्वाधिक १३ घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. एप्रिलमध्ये शाळांना सुटी लागल्यानंतर अनेक नागरिक बाहेरगावी जातात. या काळात चोरीच्या घटना वाढतात. त्यातच यंदा निवडणूक असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरांत घरफोड्यांबरोबर, रस्त्यात अडवून लूटमार, दुचाकीचोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत नागरिक गावी अथवा पर्यटनाला जातात. अशा वेळी चोरटे अनेक दिवस बंद असलेली घरे टार्गेट करतात. अनेकदा घरमालक घरी परतल्यानंतरच अशा घटना उघडकीस येतात. सुटीच्या काळातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये धाकधूक असते. त्यामुळे अनेकदा पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होते.
मात्र, चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत आम्ही जनजागृती करत आहे. सुटीच्या काळात बाहेर जाताना नागरिकांनी आपल्या शेजाऱ्यांना घराकडे लक्ष देण्यास सांगावे. गृहसंकुलातील सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्यास सूचित करावे. घरातील सोने, किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात. गृहसंकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी केल्या आहेत.