अपघाती मृत्युप्रकरणी दोन महिन्यांनी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:39 AM2021-05-24T04:39:03+5:302021-05-24T04:39:03+5:30
ठाणे : घोडबंदर रोड येथील युनिव्हर्सल पेट्रोलपंपासमोरील रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोच्या धडकेत नंदा भागवत निकम (५१, रा.कोपरी, ठाणे) या महिलेचा ...
ठाणे : घोडबंदर रोड येथील युनिव्हर्सल पेट्रोलपंपासमोरील रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोच्या धडकेत नंदा भागवत निकम (५१, रा.कोपरी, ठाणे) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी टेम्पो चालक सलमान सत्तार अली (२६, रा.मुंबई) याच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरी कॉलनी बुद्धविहाराच्या जवळ राहणारी ही महिला ३ मार्चला दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील युनिव्हर्सल पेट्रोलपंप येथून पायी जात होती. त्याच वेळी भरधाव आलेल्या सलमान अली (२६) याच्या टेम्पोची नंदा हिला जोरदार धडक बसली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी सलमान याने तिथून पळ काढला. काही नागरिकांनी नंदा हिला नौपाडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणी सुरुवातीला ३ मार्च, २०२१ रोजी दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, अपघात घोडबंदर रोडवर झाल्यामुळे हे प्रकरण चितळसर पोलीस ठाण्यात वर्ग झाले. आधी यातील टेम्पोचा क्रमांकही पोलिसांना मिळाला नव्हता. सीसीटीव्हीच्या आधारे यातील टेम्पोचा क्रमांक पोलीस उपनिरीक्षक कुणाल गांगुर्डे आणि पोलीस हवालदार रफिक मुलाणी यांच्या पथकाने शोधला. त्या आधारे टेम्पो चालक सलमान याचाही शोध घेण्यात आला. २२ मे, २०२१ रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला कायदेशीर नोटीसही बजावल्याचे चितळसर पोलिसांनी सांगितले.