दोन महिन्यांनी मिळाला ‘त्या’ सोसायटीला टँकर
By admin | Published: April 10, 2016 01:20 AM2016-04-10T01:20:24+5:302016-04-10T01:20:24+5:30
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने
डोंबिवली : ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही नागरिक पाणीकपातीमुळे त्रस्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने टंचाईमुळे फेब्रुवारीत टँकर बुक केला होता. मात्र दोन महिने झाले तरी तो आला नाही. या संदर्भात ‘लोकमत’च्या गुरुवारच्या ‘हॅलो ठाणे’ मध्ये ‘टँकरचीही होतेय पळवापळवी’ अशी बातमी प्रसिद्ध होताच रविवारी पालिकेने या सोसायटीत टँकर पाठवला.
या सोसयाटीने फेब्रुवारीत टँकर बुक केले होते. त्यापैकी दोन टँकर आले होते. मात्र उर्वरित टँकरसाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत होते. सोसयाटीने पाठपुरावा केला नसल्याने टँकर मिळाला नसेल, अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिली होती. वास्तविक अनेकदा सोसायटीचे रहिवाशी किंवा पदाधिकारी या कार्यालयात जात असत. पण तेथील अधिकारी दादच देत नव्हते. अखेर याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत रविवारी दुपारी टँकर आला. पाणी मिळाल्याने इमारतीतील रहिवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. शास्त्रीनगरचा जलकुंभच भरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिकेकडूनच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. पूर्वी दुपारी १२ वाजता जलकुंभ भरत असत. मात्र आता दुपारी दोनपर्यंतही तो भरत नाही. आम्ही असेल तेवढे पाणी सोडतो असे, सूत्रांनी सांगितले. जेमतेम दीड तास आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने टाकी भरत नाही. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र याच जलकुंभातून अन्य भागात व्यवस्थित पाणीपुरवठा कसा होतो, असा सवालही विचारला जात आहे.