दोन महिन्यांत ठाण्यात दीड हजार जणांना श्वानदंश
By admin | Published: June 19, 2017 04:58 AM2017-06-19T04:58:58+5:302017-06-19T04:58:58+5:30
ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भटक्या श्वानांची दहशत वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात तब्बल ८०२, तर मे महिन्यात ७०२ जणांना श्वानदंश झाला असून सरासरी दिवसाला २५ जणांचे श्वानांनी लचके तोडल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस भटक्या श्वानांची समस्या बिकट होत चालली आहे. त्यातच शहराचा वाढता विस्तार आणि जागोजागी होणारा कचरा तसेच गल्लीबोळातील चायनीज गाड्यांमुळे श्वानांना खाण्यास मिळत आहे. तसेच श्वानांमुळे अस्वच्छता पसरू लागली आहे. त्यातून भटके श्वान मोटारसायकलवरून येजा करणाऱ्यांचा पाठलाग करताना शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. या श्वानांमुळे चावा घेतल्याने जखमी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दरम्यान, २०१५ या वर्षभरात ६ हजार ७२२ जणांना श्वानदंश झाला आहे. त्या वर्षातील डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ७९९ जणांना श्वानदंश झाला होता. त्यापाठोपाठ मार्च ६९४, नोव्हेंबर ६३३ आणि जानेवारी ६३० जणांना श्वानदंश झाल्याचे समोर आले आहे. तसेच २०१६ या वर्षात जानेवारीत सर्वाधिक १ हजार ४८१ जणांना तसेच फेब्रुवारी ते मे महिन्यात सरासरी ५०० जणांना श्वानदंश झाला आहे. जूनमध्ये ४११, तर जुलै महिन्यात २३३ जणांना श्वानांनी आपले लक्ष्य केले होते. त्यानुसार, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत तब्बल दोन हजार १५५ जणांचे श्वानांनी लचके तोडले आहेत. एप्रिल २०१७ या एका महिन्यात ८०२, तर मे महिन्यात ७२७ जणांना श्वानांनी दंश केल्याची नोंद ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली.