ओडिशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणारे आणखी दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:48 AM2021-09-04T04:48:13+5:302021-09-04T04:48:13+5:30
ठाणे : ओडिशा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. ...
ठाणे : ओडिशा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओडिशा आणि महाराष्ट्रातील गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याचाच गैरफायदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांकडूनही घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी अशा बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनीही गुन्हे शाखेच्या पथकांना कारवाईचे आदेश बजावले आहेत.
दरम्यान, ठाण्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना २ सप्टेंबर रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे घोडके यांच्यासह निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या पथकाने घोडबंदर रोडवरील कासारवडवली भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रशांत आणि अरमान या दोघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.
* एका आठवड्यात तिसरी कारवाई
ठाणे पोलिसांनी एका आठवड्यात ही तिसरी कारवाई केली असून यापूर्वीही ठाणेनगर पोलिसांनी ओडिशातून गांजा आणणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे.