ठाण्यातील कॅसलमिल उड्डाणपूलावरुन कोसळून दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Published: January 24, 2023 08:09 PM2023-01-24T20:09:40+5:302023-01-24T20:09:47+5:30
भरघाव वेगातील दुचाकी कठडयाला आदळली: राबोडी पोलिस ठाण्यात नोंद
ठाणे: रात्रीची पार्टी झाल्यानंतर उल्हासनगर येथील आपल्या मित्राला दुचाकीवर ठाणे रेल्वे स्थानकात भरघाव वेगात सोडण्यासाठी निघालेल्या प्रतिक मोरे (२१,रा. लोकमान्यनगर, ठाणे) याच्यासह त्याचा सहकारी राजेश गुप्ता (२६, रा. शांतीनगर, उल्हासनगर) या दोघांचा ठाण्यातील कॅसलमील येथील मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावरुन कोसळून काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. राबोडी पोलिस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रतिक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.
ठाण्यातील आरमॉलमध्ये नोकरी करणाºया या दोघाही कर्मचाºयांची सोमवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी झाली. त्यानंतर उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या राजेश याला ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सोडण्यासाठी प्रतिक त्याच्या दुचाकीवरुन निघाला होता. मंगळवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास निर्मनुष्य असलेल्या कॅसलमील उड्डाणपूलावरुन त्यांची दुचाकी भन्नाट वेगाने जात होती. त्याचदरम्यान माजीवडा ते रेल्वे स्थानकाकडील रस्त्यावर या दुचाकीची पूलाच्या संरक्षण कठडयाला जोरदार धडक बसल्यामुळे प्रतिकचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्याचबरोबर त्याच्यासह दोघेही पूलावरुन जोरदारपणे खाली फेकले गेले.
त्यांची दुचाकी मात्र पूलावरच आदळून पडली. हे दोघेही पूलावरुन खाली पडल्याचा आवाज झाल्यानंतर तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या राबोडी पोलिस चौकीतील उपनिरीक्षक महेश खणकर आणि जमादार किशोर नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यापैकी प्रतिक याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. तर राजेशचा मात्र उपचारादरम्यान पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाºयांनीही मदतीसाठी धाव घेतल्याची माहिती अविनाश सावंत यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.