खेकड्याचे निळे रक्त युकेमध्ये पाठवण्याचे आमिष : फसवणूकप्रकरणी दोन नायजेरियनला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:28 PM2018-05-29T22:28:08+5:302018-05-29T22:28:08+5:30
भारतातील आपल्या सहकाऱ्याकला ४० तर आपल्याकडे ६० टक्के रक्कम घेऊन ही नायजेरियन टोळी फेसबुक आणि इमेलद्वारे सावज हेरते. त्यांच्यापैकीच दोघा नायजेरियनला ठाणे पोलिसांनी अटक केली.
ठाणे : खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल लि. युके’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजारांची फसवणूक करण-या एजओकू संडे ऊर्फ स्टॅनली संडे (४१) आणि ओनकांची अॅन्थोनी मडू (४०) या दोघा नायजेरियनना अटक केल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली. आतापर्यंत या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगर येथील रहिवासी निनाद तेलगोटे यांना काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. त्यामध्ये ‘खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी पाहिजे असल्याचा मजकूर होता. या विक्रीतून चांगला फायदा होईल, असेही आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी बँकेतून तीन लाख ६६ हजार रुपये उकळण्यात आले. याबाबतची तक्रार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे आली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला २६ मे रोजी अब्दुल कादीर कच्छी (४०, रा. पनवेल, नवी मुंबई) यास गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली होती. त्याच्याच माहितीच्या आधारे एजजोकू आणि ओनकांची या दोन नायजेरियनला पोलिसांनी कोपरखैरणे येथून २८ मे रोजी अटक केली. तिघांच्याही अंगझडती आणि घरझडतीमध्ये ३७ मोबाइल, २१ डेबिटकार्ड, वेगवेगळ्या बँकांचे २८ चेकबुक, ४७ देशीविदेशी मनगटी घड्याळे, ३०० ब्रॅण्डेड शूज तसेच एजजोकू याचा नायझेरियन देशाचा पासपोर्ट असा दोन लाख ६० हजार ३२० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या नियंत्रणाखाली ठाकरे यांच्या पथकातील रणवीर बयेस, उपनिरीक्षक अशोक माने, वसंत शेडगे, पोलीस नाईक रवींद्र काटकर, चंद्रकांत वाळुंज, संजय बाबर, पोलीस शिपाई भगवान हिवरे आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
* काय आहे गुन्ह्याची पद्धत
एजओकू संडे आणि ओनकांची मडू यांनी फेसबुक किंवा ई-मेलद्वारे अनेकांशी संपर्क करून त्यांची कंपनी भारतातून खेकड्याचे निळे रक्त खरेदी करते आणि त्याचा औषध बनवण्यासाठी वापर करते, असे भासवून त्यांचा (केंट फार्मास्युटिकल्स लि. यूके) भारतातील संचालक अब्दुल कादीर कच्छी आणि एजंट सतीश याच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर रकमा वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर घेऊन ही रक्कम अब्दुल हा वेळोवेळी बँकेतून काढून घेत असे. त्यातील ६० टक्के रक्कम नायजेरियन आरोपी, तर ४० टक्के रक्कम अब्दुल स्वत:कडे ठेवत होता, असे तपासात उघड झाले आहे.
आंतरराष्टÑीय टोळी...
अटक केलेल्या आरोपींच्या तपासामध्ये अशा प्रकारे गुन्हा करणा-या गुन्हेगारांची आंतरराष्टÑीय टोळी असून ती सध्या भारतातील विविध राज्यांत सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. अब्दुल याच्याविरुद्ध यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये अशाच प्रकारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात त्याला अटकही झाली होती. तर, अॅन्थोनी मडू याच्याविरुद्ध मुंबईच्या कांदिवली पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या आंतरराष्टÑीय गुन्हेगारांच्या टोळीतील इतरांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहपोलीस आयुक्त पांडेय यांनी सांगितले.
‘‘गेल्या चार वर्षांपासून या कंपनीचे खाते सुरू आहे. त्यामुळे आणखीही कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधावा.’’
मधुकर पांडेय, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, ठाणे शहर