ठाण्यात घरफोडया करणाऱ्या दोघा अट्टल चोरटयांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 09:33 PM2018-11-01T21:33:40+5:302018-11-01T21:43:14+5:30

दुपारच्या वेळी एखाद्या बंद घराची टेहळणी केल्यानंतर चोरी करायची. तत्पूर्वी आजूबाजूच्या घरांना कडी लावायची. अशा प्रकारे चो-या करणा-या शादाब सिद्धीकी आणि संतोष नाईक या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ चोरीच्या गुन्हयांची उकल झाली आहे.

Two notorious thieves from Kalwa arrested in Thane | ठाण्यात घरफोडया करणाऱ्या दोघा अट्टल चोरटयांना अटक

कळवा पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्देसाडे आठ लाखांचा ऐवज हस्तगतकळवा पोलिसांची कामगिरी१२ गुन्हयांची उकल

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळवा परिसरात घरफोडया करणा-या शादाब कमर सिद्धीकी उर्फ बडा रेड्डी (२५, रा. शिळफाटा, ठाणे ) आणि संतोष नाईक (२९, रा.आतकोनेश्वरनगर, ठाणे ) या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा आठ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
कळवा परिसरातील वाढत्या घरफोडीच्या गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे तसेच चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलिकडेच गुन्हे आढावा बैठकीमध्ये दिले होते. याच पार्श्वभूमीवर घरफोडीच्या गुन्हयांच्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण आणि खब-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, तुकाराम पवळे आणि अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे उपनिरीक्षक एस. एच. पाटील, इरशाद सय्यद आदींच्या पथकाने शादाब आणि संतोष या दोघांना ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्यांनी कळव्यातील एका घरातून सोने आणि चांदीचे दागिने चोरले होते. कळवा आणि मुंब्रा परिसरातील असे १२ गुन्हे त्यांच्याकडून उघड झाले आहेत. त्यांच्याकडून २६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच रोकड असा आठ लाख ४८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांना एक महिन्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. चौकशीमध्ये त्यांना वेगवेगळया गुन्हयांमध्ये न्यायालयाच्या परवानगीनंतर पुन्हा अटक केल्यानंतर हे सर्व गुन्हे उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेकॉर्डवरील गुन्हेगार
शादाब आणि संतोष हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दुपारच्या वेळी बंद घरात चोरी करण्यासाठी ते शिरकाव करायचे. चोरी करण्यापूर्वी ज्या घरात चोरी करायची आहे, त्या घराच्या आजूबाजूच्या घरांना कड्या लावल्या जायच्या. त्यामुळे कोणाला या चोरीची चाहूल लागली, तरी मदतीसाठी कोणीही बाहेर येऊ नये, म्हणून ते घराच्या कड्या लावण्याची शक्कल लढवत होते. एका खब-याच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर या सर्वच चो-या उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: Two notorious thieves from Kalwa arrested in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.