मुंबई, ठाण्यात चोरी करणाऱ्या सराईत चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 06:59 PM2018-11-28T18:59:14+5:302018-11-28T19:10:37+5:30
मुंबईसह ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये दिवसा आणि रात्रीही चो-या करणा-या राजेश शेट्टी आणि लोकनाथ शेट्टी या सराईत चोरटयांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने जेरबंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई, ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण परिसरात दिवसा आणि रात्री चो-या करणा-या राजेश शेट्टी (४२,रा. जोगेश्वरी, मालाड, मुंबई) आणि लोकनाथ शेट्टी (२२, रा. कांजूरमार्ग, मुंबई) या दोन सराईत चोरटयांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने नुकतीच जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एक लाख ५७ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई- ठाण्यात चोरी करणारी एक दुकल ठाण्याच्या कोपरी आनंदनगर भागात येणारी असल्याची माहिती वागळे इस्टेट युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली रणवरे यांच्यासह उपनिरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, जमादार बाबू चव्हाण, पोलीस नाईक राजू गायकवाड आणि कॉन्स्टेबल सागर सुरळकर या पथकाने सापळा रचून आनंदनगर येथून २० नोव्हेंबर रोजी राजेश आणि लोकनाथ या दोघांनाही अटक केली. त्यांनी कापूरबावडी, कोपरी, वागळे इस्टेट, मुलूंड, माणिकपूर (वसई) आदी परिसरात दहा चो-या केल्याची कबूली दिली. याच चोरीतील त्यांच्याकडून एक लाख ५७ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दोघेही अट्टल चोरटे असून ठाणे शहर आणि ग्रामीण भागात त्यांच्याविरुद्ध २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. वागळे इस्टेट पाठोपाठ मुलूूंड पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. वागळे इस्टेट पोलीसही त्यांचा लवकरच ताबा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्याकडून आणखीही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.